अमरनाथ यात्रेकरुंना जम्मूतील गुंडांकडून दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:33 IST2016-07-13T00:06:13+5:302016-07-13T00:33:18+5:30
श्रीगोंदा: अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील सात भाविकांना जम्मुतील गुंडांकडून दमदाटी करण्यात आली. यात्रेकरुंकडून ही माहिती मिळाल्यानंतर

अमरनाथ यात्रेकरुंना जम्मूतील गुंडांकडून दमदाटी
श्रीगोंदा: अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील सात भाविकांना जम्मुतील गुंडांकडून दमदाटी करण्यात आली. यात्रेकरुंकडून ही माहिती मिळाल्यानंतर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी खासदार दिलीप गांधी व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. या नेत्यांनी सूत्रे हलविल्यानंतर या भाविकांना रात्री स्थानिक पोलिसांची मदत मिळाली. नंतर पोलीस संरक्षणात या भाविकांना अमृतसर रेल्वे स्थानकात सोडण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यातील अशोक देवधर (श्रीगोंदा फॅक्टरी), दादा करांडे (श्रीगोंदा स्टेशन), अर्जून शेलार (श्रीगोंदा) हे भाविक अमरनाथ यात्रेसाठी सहकुटुंब गेले आहेत. यामध्ये चार पुरुष, तीन महिला भाविकांचा समावेश होता. अमरनाथ दर्शन करुन सोमवारी रात्री हे सर्वजण परतीच्या प्रवासासाठी जम्मू येथे आले. येथून परिवहन मंडळाच्या बसने ते रात्री अमृतसरकडे रवाना होण्यापूर्वीच जम्मुतील स्थानिक गुंडांनी त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. बस अमृतसरकडे निघाल्यानंतर ही दमबाजी वाढतच गेली.
हिंदीतून भाविकांना दमदाटी करणारांची संख्या वाढू लागली. बसमधील काही महिला सहप्रवाशी या स्थानिक गुंडाच्या सहकारी असल्याचे अशोक देवधर यांच्या लक्षात आले. भाविक यात्रेकरू व महिलांना हिंदीतून केली जाणारी दमबाजी व शेरेबाजी यामुळे भीतीचे वातावरण झाले. देवधर यांनी रात्री दहाच्या सुमारास गुंडांची नजर चुकवून राजेंद्र नागवडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. नागवडे यांनी तत्काळ बाळासाहेब थोरात व दिलीप गांधी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडीक यांनाही माहिती देऊन खा.गांधी यांच्याशी संपर्कात राहून मदतीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
( तालुका प्रतिनिधी)
खा. गांधी यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून भाविकांना पोलिसांची मदत देण्याची विनंती केली. आमदार थोरात यांनी जम्मू व अमृतसरमधील पोलीस मुख्यालयाशी संपर्क केला. देवधर व सहप्रवाशी अमृतसर येथे रात्री सव्वा अकरा वाजता बसमधून उतरताच त्यांना तेथील विभागीय पोलीस महासंचालकांनी धीर दिला. दोन पोलीस शिपाई या यात्रेकरुंच्या मदतीला दिले. पोलिसांनी या यात्रेकरुंना बंदोबस्तात अमृतसर रेल्वे स्थानकात सोडले.