टक्का घसरला तरीही मुलींनीच मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 23:45 IST2016-05-25T23:39:59+5:302016-05-25T23:45:20+5:30
अहमदनगर : बारावीच्या परीक्षेत गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेली घसरगुंडी यंदाही कायम राहिली़ २०१३ साली पुणे विभागात नगर अव्वल होता़

टक्का घसरला तरीही मुलींनीच मारली बाजी
अहमदनगर : बारावीच्या परीक्षेत गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेली घसरगुंडी यंदाही कायम राहिली़ २०१३ साली पुणे विभागात नगर अव्वल होता़ मात्र, त्यानंतर नगरचा निकाल सातत्याने ढासळत आहे़ मुलींनी या वर्षीही निकालात बाजी मारली असली तरी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलींमध्येही तीन टक्क्यांनी घसरले आहे़ तर एकूण निकाल ५ टक्क्यांनी घसरला आहे़
नगर जिल्ह्यातील ३६८ विद्यालयांमधून ५७ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी या वर्षी परीक्षा दिली़ हे सर्व विद्यार्थी नियमित होते़ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५ टक्क्यांनी निकाल घसरला आहे़ मुलींनी बारावीतले अव्वल स्थान कायम राखले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही घसरले आहे़ गेल्या वर्षी ९५़७० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या़ तर या वर्षी हेच प्रमाण ९२़४६ टक्क्यापर्यंत घसरले आहे़ मागील वर्षी जिल्ह्यातील तब्बल ३५ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला होता़ यंदा १०० नंबरी विद्यालयांचे प्रमाणही दुपटीने कमी झाले आहे़ यंदा केवळ अठरा विद्यालयांचाच निकाल १०० टक्के लागला आहे़
२०१४ साली नगरचा बारावीचा निकाल ९३़२७ टक्के, २०१५ साली ९२़२७ टक्के तर या वर्षीचा निकाल ८७़१२ टक्के इतका लागला आहे़ गेल्या वर्षी सहा टक्के निकाल वाढला होता़ मात्र, यंदा त्यात पाच टक्क्यांची घसरण झाली आहे़ या वर्षी बारावीच्या परीक्षेत ८३़३६ टक्के मुले तर ९२़४६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत़
मुले व मुलींमध्ये तब्बल दहा टक्क्यांचा फरक आहे़ विषयानुसारही मुलींनी टक्केवारीत बाजी मारली आहे़ मात्र, सलग तिसऱ्या वर्षीही विभागात नगरची घसरण कायम राहिल्याने शैक्षणिक वर्तुळात बुधवारी फारसे उत्साहपूर्ण वातावरण पहायला मिळाले नाही़
सोशल मीडियाचा वापर करण्यामध्ये मुलींपेक्षा मुले आघाडीवर आहेत़ सतत मोबाईलमध्ये डोके अडकवून बसण्याची वृत्ती मुलांमध्ये वाढीस लागली आहे़ सोशल मीडियाचा अतिरेकी वापर नकारात्मक मानसिकता तयार करतो़ त्यामुळे मुलांमधील टक्केवारी सातत्याने घसरत आहे़ गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियाचा अतिरेकी वापर वाढल्यामुळे व पालकांचेही मुलांकडे लक्ष नसल्यामुळे यंदाचा निकाल निराशाजनक असल्याचा सूर जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात उमटला आहे़