नेवासा (जि. अहमदनगर) : योग्य भाव मिळत नसल्याने पुनतगाव येथील शेतकºयाने राज्य सरकारचा निषेध करीत नेवाशाच्या आठवडे बाजारात १,५०० किलो उन्हाळ कांद्याचे मोफत वाटप केले. मुख्यमंत्री निधीसाठी दानपेटी तयार करून त्यात दान टाकावे, असे आवाहनही करण्यात आले होते. मोफत कांदा घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. काहींनी पाच-दहा रुपये दानपेटीमध्ये टाकले.पोपटराव वाकचौरे यांनी नेवासा खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर चारचाकी वाहनावर ‘मोफत कांदा’ असा फलक लावलेला होता. ते ‘फुकट कांदे, फुकट कांदे’, अशी आरोळी देत होते. त्यांनी आणलेला तब्बल १,५०० किलो कांदा अर्ध्या तासात संपला.यापूर्वी सातारा बाजार समितीत साडेचारशे किलो कांदा विकल्यानंतर वाहतूक व हमालीचे पैसे देऊन रामचंद्र जाधव या शेतकºयाच्या हाती काहीच शिल्लक राहिले नव्हते. उलट त्यांना व्यापाºयालाच जास्तीचे पाच रुपये देण्याची वेळ आली होती.‘मोफत कांदा’ फलक : चार वर्षांपासून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव खूश आहोत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर अभिनंदन. प्रत्येक व्यक्तीस पाच किलो कांदा मोफत, असा उपरोधिक मजकूर वाकचौरे यांनी ‘मोफत कांदा’ या फलकावर लिहिला होता.एक व दीड रुपया किलो, असा भाव निघाल्याने हवालदिल झालो. शासनाकडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू आहे. एक लीटर पाण्याच्या बाटलीला तुम्ही वीस रुपये देता. मात्र आम्हा शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल भाव देऊन देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.- पोपटराव वाकचौरे, शेतकरीफुकट वाटपासाठी १३ हजारांचा भुर्दंडकांदा उत्पादनासाठी एकरी ८० हजारांपर्यंत खर्च झाला. एका एकरात १२ टन उत्पादन झाले. त्यामधील दीड टन कांद्याचे मोफत वाटप केले. त्याचा उत्पादन खर्च अंदाजे १० हजार रुपये, कांद्यासाठी वापरण्यात आलेल्या ३० गोण्यांचे ९०० रुपये, कांदा भरण्यासाठी२५ रुपये गोणीप्रमाणे ७५० रुपये, नेवाशापर्यंत वाहतूक खर्च ५०० रुपये, बनविण्यात आलेल्या फलकाची किंमत ४०० रुपये होती. असा एकूण १२ हजार ८५० रुपये खर्च झाल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.
कवडीमोल भावामुळे १५०० किलो कांद्याचे फुकटात केले वाटप; नेवाशात शेतकऱ्याचे अजब आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:50 IST