खंडकऱ्यांचे प्रलंबित जमीन वाटप लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:34+5:302021-09-02T04:46:34+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाची ११४ प्रकरणे आता प्रलंबित राहिली आहेत. त्यामध्ये ५३ प्रकरणांमध्ये न्यायालयांत याचिका दाखल आहेत. दत्तनगर व ...

खंडकऱ्यांचे प्रलंबित जमीन वाटप लवकरच
श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाची ११४ प्रकरणे आता प्रलंबित राहिली आहेत. त्यामध्ये ५३ प्रकरणांमध्ये न्यायालयांत याचिका दाखल आहेत. दत्तनगर व बेलापूर येथे प्रत्येकी ५० टक्के जमीन वाटपावर समाधानी नसलेले सुमारे १५ शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका केल्या आहेत. कौटुंबिक स्तरावर ३६ प्रकरणे प्रलंबित आहेत. याशिवाय प्रशासकीय पातळीवर तसेच भूमी अभिलेख स्तरावर १७ प्रकरणांवर अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. राहाता तालुक्यातील ६६ खंडकऱ्यांना अद्यापही जमिनीचे वाटप होऊ शकलेले नाही. तेथेही २७ वाद न्यायालयात पोहोचले आहेत.
शिर्डी, सावळीविहीर, निमगाव कोर्हाळे तसेच श्रीरामपुरातील दत्तनगर येथे खंडकऱ्यांना वाटपातील संपूर्ण जमिनी देण्यास प्रशासन तयार नाही. त्यातील ५० टक्के जमीन इतरत्र देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र शेतकरी त्याविरोधात न्यायालयात गेले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमीन वाटपाचा तिढा तीन महिन्यांमध्ये सोडविण्याची ग्वाही दिली.
---------
आमदार कानडे यांची मागणी
हरेगाव येथे शेती महामंडळाच्या वाड्यांवर शेकडो कामगार ५० वर्षांपासून राहत आहेत. मात्र अद्यापही तेथील निवासी जागा त्यांच्या नावावर होऊ शकलेली नाही. शहरालगत गायकवाड वस्ती येथेही तसाच प्रश्न आहे. सरकारच्या सर्वांना घरे देण्याच्या योजनेला त्यामुळे खीळ बसलेली आहे. घरकुलांचे प्रस्ताव मंजूर असूनही जागेच्या मालकीअभावी अंमलबजावणी होत नाही, अशी खंत आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केली व तोडगा काढण्याचे आवाहन केले.
--------