युती तुटल्याने नगर भाजपात जल्लोष!

By Admin | Updated: September 27, 2014 00:14 IST2014-09-26T23:59:26+5:302014-09-27T00:14:19+5:30

अहमदनगर : शिवसेना-भाजपा युती तुटल्याने नगर शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला आहे.

The alliance broke down in the city! | युती तुटल्याने नगर भाजपात जल्लोष!

युती तुटल्याने नगर भाजपात जल्लोष!

अहमदनगर : शिवसेना-भाजपा युती तुटल्याने नगर शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला आहे. युती तुटू नये, या प्रामाणिक भावनेपेक्षा नगरमधील शिवसेनेच्या जाचातून मुक्तता झाल्याचा आनंद भाजपा पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. आता कोणालाही तिकिटे देऊन कोणाचेही पाय धुण्याची वेळ येणार नाही, यासाठी भाजपाच्या निष्ठावंतांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
शिवसेना-भाजपाची युती तुटल्याची घोषणा गुरुवारी सायंकाळी झाली. त्यानंतर नगरमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या गोटात वेगवान हालचाली झाल्या. आमदार अनिल राठोड, खासदार दिलीप गांधी, वसंत लोढा, सत्यजित तांबे, किशोर डागवाले, संग्राम जगताप यांच्या कार्यालयात तातडीच्या बैठका झाल्या. त्यामध्ये विधानसभेमध्ये प्रचाराची रणनिती ठरविण्यात आली.
शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये नेहमीच धुसफूस राहिलेली आहे. लोकसभेत युती असुनही शिवसेनेने भाजपाचा कधीच प्रचार केला नव्हता. भाजपाने मात्र राठोड यांचा प्रामाणिकपणे प्रचार केल्याचा दावा केला आहे. (प्रतिनिधी)
आता पंचरंगी लढत
शिवसेनेची आमदार अनिल राठोड यांना, काँग्रेसची सत्यजित तांबे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची संग्राम जगताप यांना उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी अपक्ष आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र भाजपाचा उमेदवार कोण आहे, याची निश्चिती नव्हती. भाजपाची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी मुंबईवारी केली. त्यासाठी खासदार गांधी, आमदार कर्डिले यांनीही काहींसाठी शिष्टाई केल्याची माहिती आहे. अखेर शुक्रवारी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली. मनसेने वसंत लोढा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेमुळे लोढा यांची उमेदवारी गोठणार का? याकडे लक्ष लागले आहे. सध्यातरी नगर शहरामध्ये पंचरंगी लढत होणार असून मतविभाजनाचा नक्की कोणाला फायदा होणार? हे पाहणे गमतीशीर असणार आहे.

Web Title: The alliance broke down in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.