पारनेर तालुक्यातील ४३ गावांमधील सर्व व्यवहार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:24+5:302021-08-13T04:25:24+5:30

पारनेर : तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याने पारनेर, टाकळी ढोकेश्वर, सुपा, भाळवणी, जवळा, निघोजसह ४३ गावांमध्ये १० ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले ...

All transactions started in 43 villages of Parner taluka | पारनेर तालुक्यातील ४३ गावांमधील सर्व व्यवहार सुरू

पारनेर तालुक्यातील ४३ गावांमधील सर्व व्यवहार सुरू

पारनेर : तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याने पारनेर, टाकळी ढोकेश्वर, सुपा, भाळवणी, जवळा, निघोजसह ४३ गावांमध्ये १० ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. आता येथील व्यवहार सुरळीत होणार आहेत. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर दुकाने उघडी राहिल्यास कडक करण्यात येईल, असे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी बैठकीत सांगितले.

पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्वांबरोबर चर्चा करून ३२ गावांमध्ये १० ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. मंगळवारी याची मुदत संपल्यावर बुधवारपासून व्यवहार पूर्ववत सुरू झाले होते.

बुधवारी सायंकाळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, प्रभारी तहसीलदार अविनाश रणदिवे, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे, मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांची एकत्रित बैठक झाली.

यामध्ये पारनेर तालुक्यात अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हा तिसऱ्या श्रेणीत असल्याने दुपारी ४ वाजेपर्यंतच व्यवहार सुरू ठेवता येतील, असे प्रांताधिकारी भोसले यांनी सांगितले. पारनेर शहरात ६ दुकाने दुपारी ४ वाजेनंतर उघडी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे मुख्याधिकारी डॉ. कुमावत यांनी सांगितले. पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक बळप यांनी सांगितले.

---

दहा गावे अजूनही कोरोनाच्या विळख्यात

पारनेर, निघोज, वडगाव सावताळ, शिरापूर, वासुंदे, कान्हूर पठार, जवळा गाडीलगाव ही गावे अजूनही कोरोनाच्या विळख्यात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले.

----

तालुक्यात व्यावसायिक आणि सर्वांनी आपले व्यवहार दुपारी ४ वाजेनंतर बंद ठेवण्यात यावेत. नंतर दुकाने उघडी दिसल्यास महसूल, पोलीस, नगरपंचायत, पंचायत समिती यांच्याकडून कडक कारवाई करण्यात येईल. पुढचे लॉकडाऊन टाळायचे असल्यास आताच नियम पाळावेत.

-सुधाकर भोसले,

प्रांताधिकारी

Web Title: All transactions started in 43 villages of Parner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.