अहमदनगर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व कँटोन्मेंट बोर्डअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना सरसकट कोविड लस देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
सध्याच्या कोविड परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील शिक्षकांना शाळा व तालुकास्तरावरच्या कोविड केंद्रांवर विविध प्रकारची कामे करण्याचे आदेश दिले जातात. शिक्षक त्यांच्यावर सोपवलेल्या क्वारंटाइन केंद्रावर दिलेल्या ड्यूटी विनातक्रार पार पाडतात. शिक्षकांना घरोघरी फिरून अशा बिकट परिस्थितीत वेगवेगळी सर्वेक्षणे करावी लागतात. शिष्यवृत्ती परीक्षा व इतर गुणवत्ता उपक्रमासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात येतात. शिक्षण आपल्या दारी उपक्रमात आपला नगर जिल्हा राज्यात आघाडीवर होता. शिवाय चेकपोस्ट व रेल्वे स्थानकावर शिक्षकांनी प्रशासनाने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. एकंदर कोविड योद्धा म्हणून ही सारी कामे शिक्षक विनातक्रार पार पडतात; परंतु यातून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. सध्या फक्त ४५ वर्षे वयापुढील व्यक्तींनाच कोविड लस दिली जात असल्याने अनेक शिक्षक या अटीत समाविष्ट होऊ शकत नाहीत. त्यामुळे आवश्यकता असूनही शिक्षकांना सुरक्षतेसाठी लस घेता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे प्राधान्याने सरसकट कोविड लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक नेते संजय कळमकर, राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी, संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, केंद्रप्रमुख सूर्यभान काळे, वृषाली कडलग, सीताराम सावंत, भास्कर नरसाळे, संजय नळे, गणपत देठे यांनी केली आहे.
..................
शिक्षिकांनाही कोरोना योद्धा म्हणून काम करावे लागते. घरोघरी फिरून शिक्षिकांनी प्रामाणिकपणे विविध प्रकारची सर्वेक्षणे केली आहेत. घरातील स्त्रियांचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण घराचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे शिक्षक-शिक्षिकांबरोबरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे प्राधान्याने लसीकरण होणे आवश्यक आहे.
-डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते