सर्व दुकाने सुरू, मग पांडुरंगाचे दर्शन बंद का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:07+5:302021-06-09T04:26:07+5:30
जवळे : शासनाने कोरोनाच्या नावाखाली सर्वत्र केवळ मंदिरे बंद केली आहेत, तर दुकाने उघडी आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद या ...

सर्व दुकाने सुरू, मग पांडुरंगाचे दर्शन बंद का?
जवळे : शासनाने कोरोनाच्या नावाखाली सर्वत्र केवळ मंदिरे बंद केली आहेत, तर दुकाने उघडी आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद या निवडणुकांना बंदी नाही. केवळ आमच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी बंदी का, असा सवाल दिंडीचालक, विणेकरी, वारकऱ्यांनी केला.
श्री क्षेत्र पिंपळनेर (ता. पारनेर) येथील संत निळोबाराय महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणात पिंपळनेर ते पंढरपूर आषाढी वारीबाबत रविवारी निळोबारायांचे वंशज, पालखी सोहळाप्रमुख गोपाळकाका मकाशीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.
गोपाळकाका म्हणाले, पंढरपूरची आषाढी वारी ही साडेतीनशे वर्षांपूर्वी श्री संत निळोबाराय महाराज व संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सुरू केली आहे. ही वारी आजही अखंडपणे सुरू असून, कितीही कोणतीही संकटे आली तरी शासनाने ती बंद पडू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष अशोकराव सावंत म्हणाले, शासनाने मागील वर्षीप्रमाणे अथवा शक्य झाल्यास सर्व वारकऱ्यांना पांडुरंग दर्शनाची संधी द्यावी. ५ जुलै रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पालखीचा पहिला मुक्काम असेल. ६ जुलै रोजी संत श्री निळोबाराय महाराज मंदिराच्या प्रांगणातून पंढरपूरकडे प्रस्थानासाठी शासनाने आम्हाला परवानगी द्यावी. शासनाने घालून दिलेल्या नियम, निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, सचिव लक्ष्मण खामकर, निळोबाराय सेवाभावी संस्था सचिव चांगदेव शिर्के, विणेकरी पांडुरंग रासकर, भाऊसाहेब लटाबंळे, राजेंद्र पठारे, सुरेश ज्ञानदेव पठारे, दिंडीचालक, विणेकरी, वारकरी उपस्थित होते.