अकोल्यात पावसाची संततधार सुरूच, मुळा दुथडी
By Admin | Updated: July 4, 2016 23:45 IST2016-07-04T23:32:45+5:302016-07-04T23:45:59+5:30
अकोले : तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील ढगांच्या झुंबीमुळे घाटघर-रतनवाडी या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रुद्रावतारी पाऊस ओसरला असला

अकोल्यात पावसाची संततधार सुरूच, मुळा दुथडी
अकोले : तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील ढगांच्या झुंबीमुळे घाटघर-रतनवाडी या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रुद्रावतारी पाऊस ओसरला असला तरी सोमवारी दिवसभर जोरदार सरींसह रिमझिम पाऊस बरसला. सायंकाळी पावसाचा जोर वाढलेला होता. गेल्या २४ तासात भंडारदरा धरणात जवळपास ८०० दशलक्ष घनफूट अशी विक्रमी नव्या पाण्याची आवक झाली. त्यामुळे आता भंडारदऱ्याचा एकूण साठा १७७६ दशलक्ष घनफूट झाला आहे.
सोमवारी सकाळी ६ वाजता गेल्या २४ तासात घाटघर येथे २०६, तर रतनवाडी २६८, पांजरे येथे १६९ व अकोल्यात १४० मिलीमिटर अशी विक्रमी पावसाची नोंद झाली. भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली असून भात रोपे तरारली आहेत. भात खाचरातील तण काढणे व गाळ करण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. आता आदिवासी भागात भात आवणीचे वेध सुरु झाले आहे. सोमवारी सकाळी झालेली पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये (कंसात यंदाचा एकूण पाऊस) भंडारदरा-१०४ (२६०), घाटघर-२०६ (७२३), रतनवाडी- २६८ (५४१), पांजरे-१६९ (३४७), वाकी-१३९ (३१२), निळवंडे-१२६ (१५५),आढळा-३७ (५७),अकोले-१४० (२१०),कोतूळ-६८ (१३०) तसेच सोमवारी संध्याकाळी भंडारदरा धरणात- १ हजार ७७६, निळवंडे धरणात-५०८, तर आढळा धरणात १४१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.
तालुक्यात सोमवारी सर्वदूर रिमझिम सरी पडल्या. आंबीत, बलठण या लघूपाटबंधारे तलावांपाठोपाठ ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेचा पिंपळगाव खांड लघू पाटबंधारे प्रकल्प व शिरपुंजे, कोथळे, वाकी हे तलाव ओसंडून वाहिले.
गणोरे परिसरात जोरदार सरी
गणोरे : आढळा परिसरात तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी जोरदार पावसाची हजेरी लागली. खरीप पिकांच्या पेरणीसाठी आता उशीर झाल्याने शेतकरी युद्धपातळीवर तयार आहेत.
सोमवारी दिवसभर पाऊस उघडला होता. आता मशागतीसाठी जमीन वाफसा होण्याची प्रतीक्षा आहे. आढळा धरणाच्या परिसरातील गेल्या महिन्याभरात फक्त वीस मिलिमीटर तर काल एकाच दिवसात ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला एकूण ६५ मिलिमीटर पाऊस झाला होता. आढळा धरणातील पाणीसाठा १४१ दशलक्ष घनफूट असून अद्याप नवीन पाण्याची आवक झालेली नाही. तसेच नवीन चारा येण्यासही वेळ लागेल. (प्रतिनिधी)
बोटा : अकोले तालुक्यातील सर्वदूर पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पठार भागातील नदीलगतच्या घारगाव व साकूर, तसेच इतर गावांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. अकोले तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने या भागातून उगम पावणारी मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. या भागात होत असलेल्या समाधानकारक पावसाने धूळ वाफेवरील खरिप हंगामातील पेरण्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही.
मुळा धरण पाणलोटात पाऊस सुरू असल्याने सोमवारी दुपारी ७३०० क्सुसेक वेगाने धरणात पाण्याची आवक सुरू झाली. त्यानंतर सायंकाळी आवक १००० क्युसेकने घटून ६२०० वर आली. सध्या मुळा धरणात ५५३५ दशलक्ष घनफूट पाणी आहे.
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात गेल्या २४ तासात १ इंच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
शहरात आत्तापर्यंत ६९ मिली मीटर पाऊस झाला आहे. दारणा धरणात पाण्याची चांगली आवक झाली आहे. महालखेडा(४० मिलीमीटर), पढेगाव (३०), नांदूर मधमेश्वर (२१), ब्राम्हणगाव (३६).