जिल्ह्यात रोज साडेतीन हजार चाचण्यांचे उद्दिष्ट
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:36+5:302020-12-06T04:21:36+5:30
अहमदनगर : थंडी सुरू झाल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लस येईपर्यंत नियमांचे पालन करणे ...

जिल्ह्यात रोज साडेतीन हजार चाचण्यांचे उद्दिष्ट
अहमदनगर : थंडी सुरू झाल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लस येईपर्यंत नियमांचे पालन करणे आणि कोरोना चाचण्या वाढविणे हा एकच पर्याय प्रशासनासमोर उरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातही चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या दोन हजार चाचण्या होत आहेत, त्यामध्ये आणखी रोज दीड हजार चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता यापुढे रोज ३ हजार ५०० चाचण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी शक्यता होती. कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यंदा दिवाळीत फारशी थंडी नसल्याने कोणतीही लाट आली नाही. मात्र, थंडी सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये थंडीची लाट राहणार आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. ६५ टक्के आरटीपीसीआर व २५ टक्के चाचण्या ॲन्टिजेन कराव्यात, अशाही सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने चाचण्यांचे नियोजन केले आहे. ३५०० कोरोनाच्या चाचण्या होणार आहेत. त्यामध्ये दररोज आरटीपीसीआर २२७५ तर ८७५ चाचण्या ॲन्टिजेन कीटद्वारे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या दररोज १८०० ते २००० चाचण्या करण्यात येत आहेत.
--------------
सध्या दररोज चाचण्या होत आहेत- २०००
दररोज चाचण्या कराव्या लागणार-३५००
--------------------
उपलब्ध खाटा
कोविड केअर सेंटर-५८९९
डेडिकेटेड कोविड सेंटर-२००५
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल-११३७
एकूण खाटा-९०४१
---------------------
दहा दिवसांमध्ये २७१५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. म्हणजे दररोज २०० पेक्षा जास्त चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. चाचण्यांमधून पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण केवळ १० टक्के आहे. सध्या दोन हजार चाचण्या होत असून आता ३५०० चाचण्या रोज करण्यात येणार आहेत. शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांमध्ये चाचण्या करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या कराव्या लागणार आहेत. त्यासाठी लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनीही स्वत:हूनही चाचण्या करण्यासाठी पुढे यावे.
-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
-------------
अहमदनगर शहरात पूर्वी रामकरण सारडा येथे एकमेव कोरोना चाचणी केंद्र होते. मात्र, आता महापालिकेच्या सर्व सातही रुग्णालयांमध्ये कोरोना चाचण्या करण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकाला कोणत्याही महापालिकेच्या रुग्णालयात जावून चाचणी करता येऊ शकेल. तसेच शहरातील नागरिकाला जिल्हा रुग्णालयातही चाचणी करण्याची व्यवस्था असेल.
-डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
---------
फोटो- ०५ कोरोना टेस्ट