अहमदनगर म्हणजे पैलवानांचे गाव
By Admin | Updated: July 25, 2016 00:02 IST2016-07-24T23:44:14+5:302016-07-25T00:02:35+5:30
अहमदनगर : नगर है पैलवानांचे गाव आहे. पैलवान हीच नगरची खरी ओळख आहे. शरीर पाळणाऱ्यांचे गाव म्हणजे अहमदनगर आहे.

अहमदनगर म्हणजे पैलवानांचे गाव
अहमदनगर : नगर है पैलवानांचे गाव आहे. पैलवान हीच नगरची खरी ओळख आहे. शरीर पाळणाऱ्यांचे गाव म्हणजे अहमदनगर आहे. नगरमध्ये कोणीही भेटला तरी त्याला पैलवान म्हणावे लागते, अशी नगरची ख्याती आहे, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
पाईपलाईन रोडवरील एका खासगी कार्यक्रमासाठी ते रविवारी सायंकाळी नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या नगरच्या अनोख्या ओळखीला उपस्थितांनी दाद दिली. नगर येथील शिवसेनेच्या वर्चस्वाचा त्यांनी ‘पैलवान’की या शब्दातच उल्लेख केला. त्याची पोच घेण्यासाठी त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे कटाक्ष टाकला, त्यावेळी आमदार जगताप यांनी ‘नगरमध्ये पैलवान खूप झाले’, अशी मिश्किल टिप्पण्णी केली. त्यालाही खोतकर यांनी दाद दिली.
नगरच्या महापौर सुरेखा कदम यांचे माहेर जालना आहे. अर्जुन खोतकर हे जालन्याचे आमदार आहेत. त्यामुळे महापौर कदम यांनी खोतकर हे आपले काका असून महापौर होण्यासाठी त्यांचीही मोलाची मदत झाल्याचा उल्लेख केला. तर माझी लहान बहिण महापौर झाल्याचा मला आनंद झाला आहे, असे खोतकर यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. अॅड. अभिषेक भगत हे आपले जावई असून त्यांच्या आग्रहावरून नगरला आल्याचे खोतकर, आमदार शिवाजी चोथे यांनी आवर्जुन सांगितले.
दरम्यान मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले याला पाहण्यासाठी पाईपलाईन रोडवर तरुणांची मोठी गर्दी झाली होती. चौगुले यांनी शरीरसौष्ठवच्या अनेक पोझ दिल्या. त्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आणि चौगुले यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांची व्यासपीठावर एकच झुंबड उडाली. दरम्यान तरुणांच्या गर्दीमुळे पाईपलाईन रोडवरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. दरम्यान जालना येथील शिवसेनेचे आमदार असलेले, शेतकऱ्यांच्या आणि जायकवाडी पाणी प्रश्नावर सातत्याने विधानसभेत आवाज उठविणारे खोतकर यांची नुकतीच राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागली. याबद्दल महापौर सुरेखा कदम यांनी त्यांचा सत्कार केला.