अहमदनगर :मनोरुग्ण इसमाने पत्नीसह केली ३ मुलांची हत्या
By Admin | Updated: February 7, 2017 16:19 IST2017-02-07T12:58:33+5:302017-02-07T16:19:05+5:30
मानसिक संतुलन गमावलेल्या एका व्यक्तीने पत्नीसह तीन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील लोणी येथे घडली.

अहमदनगर :मनोरुग्ण इसमाने पत्नीसह केली ३ मुलांची हत्या
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 7 - मानसिक संतुलन गमावलेल्या एका व्यक्तीने पत्नीसह तीन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील लोणी येथे घडली आहे. देवीचंद हिराचंद ब्राह्मणे (वय ४०) असे त्याचे नाव असून त्याने मंगळवारी मध्यरात्री पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांची धारदार शस्त्राने हत्या केली. याप्रकरणी आरोपीला लोणी पोलिसांनी अटक केली.
लोणी खुर्द येथील पद्मश्री विखे महाविद्यालयासमोरील ब्राम्हणे याच्या घरात मंगळवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास हे भीषण हत्याकांड घडले. आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येते. पत्नी संगीता (वय ३५), मुलगी निशा (वय १५), स्नेहल उर्फ नेहा (वय १३) या तिघांचा कुऱ्हाडीने तर तर मुलगा हर्षवर्धन (वय ७) याचा गळा दाबून त्याने खून केला. हत्येनंतर आरोपी देवीचंद स्वत: सकाळी लोणी पोलीस ठाण्यात हजर झाला. याबाबत संतोष बनसोडे (रा. राजुरी) यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मयत संगीता ब्राम्हणे यांचे भाऊ संतोष बनसोडे (रा. राजुरी, ता. राहाता) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव हे करीत आहेत. आरोपी हा लोणी येथे रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातील बैल बाजारात पार्किंगचे काम करीत होता, तर पत्नी गृहिणी होती.