नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त बंद; विखे आंदोलनात; दोन कंपन्यांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 14:11 IST2018-08-09T11:40:39+5:302018-08-09T14:11:15+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद जिल्हाभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त बंद; विखे आंदोलनात; दोन कंपन्यांवर दगडफेक
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या मराठा क्रांती जनआंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नगर शहरात आंदोलकांनी जुन्या बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरु केल्याने पुणे-औरंगाबाद महामार्गाची वाहतूक बाह्यवळणमार्गे वळविण्यात आली आहे. नगर शहरातील आंदोलनात विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेही सामान्य नागरिकांत रस्त्यावर बसले आहेत.
नगर शहरात एस.टी. बसेस, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये पूर्णत: बंद आहेत. तालुक्यांच्या ठिकाणीही सर्वत्र व्यवहार बंद आहेत. नगर एमआयडीसीत काही कंपन्यांनी कामकाज सुरु ठेवल्याने इंडियन सिमलेस व एक्साईड बॅटरी या कंपन्यांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. या कंपन्यांसमोर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाथर्डी तालुक्यात अग्निशमन वाहनावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. नेवासा तालुक्यात तरवडी येथे काही दुचाकी फोडण्यात आल्या आहेत.
मुस्लीम समाजाचा पाठिंबा
मराठा समाजाच्या आंदोलनाला मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिला आहे. नगर शहरात मुस्लिम समाजाने आंदोलकांना फळ व पाणी वाटप केले.
वकील मोफत खटले लढविणार
मराठा समाज आंदोलनात ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले त्यांचे खटले मोफत लढविण्यात येतील अशी घोषणा वकिलांनी नगरच्या आंदोलनात केली.