अहमदनगर दारूकांड : शुल्क विभागाच्या जिल्हा पोलीस अधीक्षक निलंबित
By Admin | Updated: March 11, 2017 14:45 IST2017-03-11T14:44:50+5:302017-03-11T14:45:15+5:30
पांगरमल दारुकांड प्रकरण प्रकरणी प्रमुख दोषी असणार्या उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा पोलीस अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर दारूकांड : शुल्क विभागाच्या जिल्हा पोलीस अधीक्षक निलंबित
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 11 - पांगरमल दारुकांड प्रकरण प्रकरणी प्रमुख दोषी असणार्या उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा पोलीस अधीक्षक भाग्यश्री ऊर्फ अश्विनी जाधव यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून याचा अहवाल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. या प्रकरणात उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागातील चार अधिकारी आणि पाच कर्मचारी यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणात बडे पोलीस अधिकारी आणि अन्य काही अधिकारी आता रडारवर आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान विषारी दारू प्यायल्यामुळे पांगरमलसह दरेवाडी, कौडगाव येथील 14 जणांचा मृत्यू झाला. मागील महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पांगरमल (ता. नगर) येथे विषारी दारू पिल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. त्याच घटनेतील 12 जण अजूनही अत्यवस्थ आहेत. त्याचवेळी नगर तालुक्यातील दरेवाडी, कौडगाव व बाबूर्डी येथील पाच जणांचा विषारी दारूसेवनामुळे मृत्यू झाला. दारूमुळे पंधरा दिवसांच्या दरम्यान झालेल्या 14 मृत्यूंमुळे जिल्हा हादरून गेला होता.
तर दुसरीकडे, पांगरमल येथील दारूकांडाला पोलीसच जबाबदार आहेत, असे विधान खासदार दिलीप गांधी यांनी केलं होते. 'तोफखाना पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून दारू पुरवठा होत असल्याचा छडा पोलिसांना कसा लागला नाही? ही पोलिसांचीच चूक आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. लवकरच जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी होईल, अशी माहितीही खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकारांना दिली होती.