सचिन धर्मापुरीकरलोकमत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि एका मुलीसह वृद्धेचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मध्यरात्री १२.३० ते ०१.०० वाजेच्या सुमारास कोपरगावनजीक टाकळी शिवारात गोळ्या घालून ठार मारले. नंदिनी प्रेमदास चव्हाण या तीन वर्षीय चिमुरडीचा बुधवारी (दि.५) बिबट्याने बळी घेतला. या घटनेला आठवडाही उलटला नाही, तोच सोमवारी (दि.१०) बिबट्याने शांताबाई अहिलू निकोले (वय, ६०) या महिलेला ठार केले होते.
केडगाव तालुक्यातील बिबट्याला ठार करा; प्रधान मुख्य वन संरक्षकांचा आदेश
अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने परिसरात बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला. त्यामुळे या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. बिबट्याने एका चिमुकलीचा बळी घेतला, तर आठ वर्षीय मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. निंबळक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक होत गाव बंद, रास्ता रोको आंदोलन केले. बिबट्याला जेरबंद करा अथवा ठार करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. अखेर नरभक्षक बनलेल्या या बिबट्याला ठार मारण्याचे प्रधान मुख्य वन संरक्षकांनी आदेश दिला आहे.
मानव-बिबट्या संघर्ष तीव्र; आज बैठक
नाशिक : नाशिक वनवृत्तामधील नाशिक शहरासह जिल्ह्यात आणि अहिल्यानगर तसेच पुणे जिल्ह्यात मागील दोन ते तीन महिन्यांपासून मानव-बिबट संघर्ष अधिकाधिक तीव्र झालेला पाहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १७) पुणे येथे या राज्यासह या तीनही जिल्ह्यांतील मुख्य वरिष्ठ वनाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलविण्यात आली आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.