जामगावच्या वाड्यात शिक्षकांपाठोपाठ तयार होणार कृषी तंत्रज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:06+5:302021-06-20T04:16:06+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील जामगाव येथील ऐतिहासिक वाड्यात आता शिक्षकांपाठोपाठ कृषी तंत्रज्ञ तयार होणार आहेत. कौशल्यावर आधारित या कोर्सनंतर ...

जामगावच्या वाड्यात शिक्षकांपाठोपाठ तयार होणार कृषी तंत्रज्ञ
सुपा : पारनेर तालुक्यातील जामगाव येथील ऐतिहासिक वाड्यात आता शिक्षकांपाठोपाठ कृषी तंत्रज्ञ तयार होणार आहेत. कौशल्यावर आधारित या कोर्सनंतर त्या तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असणाऱ्या या वाड्यात या शैक्षणिक वर्षापासून तीन वर्षे कालावधीचा सहा सत्रांचा इंग्रजी माध्यमाचा हा कोर्स सुरू करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मान्यता दिल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी दिली.
गेल्या अर्धशतकाहून अधिक काळापासून जामगाव येथील वाड्यात महाराजा माधवराव शिंदे डीएड कॉलेज सुरू आहे. शासकीय अनुदानित हे कॉलेज ग्रामीण भागात असून राहण्यासाठी वाड्यातच होस्टेल, मेसची सुविधा आहे. त्यामुळे अतिशय कमी खर्चात हुशार गोरगरिबांच्या मुलांनी दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून लगेच शिक्षकाची नोकरी मिळाल्याने अशी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. त्यांनी शिक्षण क्षेत्राच्या नावलौकिकात भर घातल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे निरीक्षक टी. पी. कण्हेरकर यांनी सांगितले.
जामगावमध्ये संस्थेच्या मालकीची ४२० एकर शेती, सिंचनासाठी ९७ लाख लीटर क्षमतेचे शेततळे, विहिरी, कूपनलिका, परिसरात सीताफळ, आंबा, आवळा अशी फळझाडे आहेत. त्यामुळे प्रशिक्षण कालावधीत लागणाऱ्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
--
पारनेर तालुक्यातील जामगावसारख्या ग्रामीण भागातील गावात नव्याने सुरू होत असणाऱ्या कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना याचा फायदा होईल. त्यांना रोजगाराच्या संधी त्यातून प्राप्त होणार आहेत. तरुण मित्रांनी या संधीचा लाभ घ्यावा.
-नीलेश लंके,
सदस्य, नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघ