कृषी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा
By Admin | Updated: November 28, 2014 01:14 IST2014-11-28T00:40:40+5:302014-11-28T01:14:35+5:30
कुळधरण : कुळधरण येथील मंडल कृषी कार्यालय अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी बंद अवस्थेत असून, तेथील कर्मचारी कर्जत येथील तालुका कार्यालयात बसून मंडळाचा कारभार हाकत आहेत़

कृषी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा
कुळधरण : कुळधरण येथील मंडल कृषी कार्यालय अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी बंद अवस्थेत असून, तेथील कर्मचारी कर्जत येथील तालुका कार्यालयात बसून मंडळाचा कारभार हाकत आहेत़ त्यामुळे कुळधरण मंडळातील १३ गावांमधील हजारो शेतकऱ्यांना रोज तालुक्याला मंडळ कृषी अधिकारी व कर्मचारी शोधत फिरण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे कृषी विभागाकडून राबवण्यिात येत असलेल्या विविध योजना माहितच होत नसल्याने शेतकऱ्यांचा खोळंबा होत आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खते, बियाणे, कृषी अवजारे आदी कृषी पुरक साधने उपलब्ध होत असतात. तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विषयक मार्गदर्शन देण्याची व्यवस्था असते. शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र कुळधरण मंडल कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकरी या योजनापासून वंचित राहत आहेत.
कुळधरण मंडल कृषी कार्यालय हे कर्जत येथे राशीन मार्गावर आहे. त्यामुळे कुळधरण परिसरातील शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून कृषी विषयक मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी कर्जतला जावे लागते़ कर्जतला गेल्यानंतर अधिकारी क्षेत्र भेटी गेल्याचे गोंडस कारण सांगितले जाते़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेकडो रुपयांचा भुर्दंड सहन करुन मनस्तापाशिवाय हाती काहीच लागत नाही़ कुळधरण येथील मंडळ कार्यालय २००९ मध्ये स्थलांतरित करुन कर्जत येथे बांधण्यात आले़ मंडळातील अधिकाऱ्यांना मंडळ कार्यक्षेत्रात राहणे बंधनकारक असतानाही थेट कार्यालयाच कर्जतला हलवून कृषी विभागाने शेतकऱ्यांची चेष्टा चालविल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत़ कुळधरण मंडळात सर्वाधिक गावे कुळधरण परिसरातील आहेत़ मात्र, कार्यालय कर्जतला हलविण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे़ कृषी विभागाचा सर्व कारभार कर्जत येथील कार्यालयातून होत असल्याने कुळधरण येथील कृषी विभागाचे कार्यालय धूळखात असून, या कार्यालयाची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे. विविध कामासाठी नेहमीच तालुक्याच्या ठिकाणी जाणारे मोजकेच लोक अधिकाऱ्यांना हाताशी धरून वारंवार योजनांचा लाभ घेतात़ मात्र सामान्य शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचितच आहे. (वार्ताहर)