दोन महिन्यांनंतर नगरचे मार्केट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:17+5:302021-06-09T04:26:17+5:30
कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने नगर बाजार समितीमधील भाजीपाला, फळ, फुले, भुसार बाजार बंद केला होता. ...

दोन महिन्यांनंतर नगरचे मार्केट सुरू
कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने नगर बाजार समितीमधील भाजीपाला, फळ, फुले, भुसार बाजार बंद केला होता. मागील आठवड्यात नेप्ती उपबाजारात कांदा व भाजीपाला बाजार भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. मात्र, सोमवारपासून संपूर्ण जिल्हा अनलॉक झाल्यामुळे नगर बाजार समितीमधील सर्व बाजार पूर्ववत सुरू करण्यात आले. यामुळे गेले दोन महिने बंद असणारे नगर मार्केट आता भाजीपाला, तसेच फळे फुलांच्या वाढत्या आवकमुळे गजबजून गेले होते.
नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांद्याची विक्रमी ७६ हजार २२४ गोण्या म्हणजेच जवळपास ५० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. एक नंबरच्या कांद्यास १,५५० ते २,००० रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या कांद्यास १,००० ते १,५५० रुपये तर तीन नंबर कांद्यास ५०० ते १,००० रुपये भाव मिळाला. चार नंबर कांद्यास २०० ते ५०० रुपये भाव मिळाला.
नगर मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवकही दुपटीने वाढली असून, सोमवारी ५२४ क्विंटल इतक्या भाजीपाल्याची आवक झाली. आंबा, कलिंगड, नारळ, डाळिंब या फळांची आवकही नियमित सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे, गुलाब, गुलछडी, गलांडा, झेंडू, मोगरा, जरबेरी, लिली या फुलांची आवक वाढली आहे.
चौकट ; भाजीपाल्याची आवक व दर असे
( आकडे क्विंटलमध्ये )
टोमॅटो - ४५ - १,०००
फ्लॉवर - ३९- ३,०००
कोबी -१८ -१,०००
बटाटे -२२५ - १,२५०
लसुन -१५ - ७,०००
हिरवी मिरची - २५- ३,२५०
भुईमुग - २०- ३,०००
आद्रक -१८ - १,२५०
कोथंबीर -१२- ७५०
पालक -६ - ६५०
मेथी -७ - १,०००
चौकट : फुलांची आवक व दर असे
( आकडे क्विंटलमध्ये )
गुलाब - ४८५ - साडे बारा रु. जुडी
गुलछडी -२७५-५०
गलांडा - ३१०-४०
झेंडू -२१०-५०
मोगरा -१३-११०
जरबेरा -१०३ - साडे २७ रु .
लिली - १०० - साडे ३ रु.
.........
कोरोनामुळे दोन महिने नगर बाजार समितीचे सर्व बाजार बंद होते. आता नेप्ती उपबाजाराप्रमाणेच नगर मार्केटही कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या सर्वांनी नियम पाळावेत.
- अभिलाष घिगे, सभापती, नगर बाजार समिती