दोन दिवसांच्या पावसामुळे बळीराजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:05+5:302021-07-11T04:16:05+5:30
केडगाव : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संक्रात ओढावली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून चिचोंडी पाटील, भातोडी, कापूरवाडी, वाळकी, ...

दोन दिवसांच्या पावसामुळे बळीराजा सुखावला
केडगाव : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संक्रात ओढावली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून चिचोंडी पाटील, भातोडी, कापूरवाडी, वाळकी, गुंडेगाव, खातगाव टाकळी, चास, कामरगाव परिसरात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. त्यामुळे पाण्याअभावी तसेच किडींचा प्रादुर्भाव होऊन संकटात सापडलेल्या खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाचे आगमन झाल्याने बळीराजालाही दिलासा मिळाला आहे.
मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी दिल्याने नगर तालुक्यात खरीप लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तालुक्यात ४६ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून, चारा पिके धरून जवळपास ५६ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मात्र, सलामीनंतर मध्यंतरी पावसाने प्रदीर्घ उघडीप दिली होती. खरीप हंगाम धोक्यात आला होता. बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. चिचोंडी पाटील, भातोडी, पारगाव, टाकळी काझी, वाळकी, गुंडेगाव, चास, कामरगाव, सारोळा कासार, अकोळनेर, नेप्ती, जखणगाव, टाकळी खातगाव, कापूरवाडी, शेंडी, पोखर्डी परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली. दमदार पावसाअभावी सिंचन विहिरींच्या पाणी पातळीत कुठलीही वाढ झालेली नाही.
तालुक्यात मूग सोयाबीनच्या लागवडीत मोठी वाढ झाली. काही तुरळक ठिकाणी पेरणी योग्य पाऊस न झाल्याने तेथील पेरण्या खोळंबल्या. ज्या भागात पेरण्या उरकल्या होत्या तेथे पावसाअभावी पिके धोक्यात आली होती. पावसाला विलंब झाल्याने पेरण्याही विलंबाने सुरू झाल्या. परिणामी, सोयाबीनचा अपवाद वगळता उडीद, मूग या कडधान्य पिकांसह अन्य पिकांचे क्षेत्र घटले आहे. दरम्यान, आधी विलंब आणि मध्यंतरी पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनचे पिके धोक्यात सापडले होते. पाण्याचा अभाव आणि अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळी वातावरणामुळे या पिकावर हिरवी उंटअळी, खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अशात गत दोन दिवसांपासून रिमझिम स्वरूपातील पाऊस होत असल्याने पिके धुऊन निघाली. किडींचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी घटल्याने वाळकी, गुंडेगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसात ३९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
-----
नगर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला आहे. येणारे काही दिवस पावसाचेच असल्याने खरीप पिकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. तालुक्यात ६४ हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट होते. मात्र, चारा पिके धरून ५६ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
-पोपटराव नवले, तालुका कृषी अधिकारी, नगर
----
१० जखणगाव
जखणगाव येथे पावसानंतर बहरलेला मूग.
100721\img-20210710-wa0172.jpg
नगर तालुका फोटो = पावसामुळे खरीप पिकांना जिवदान मिळाले जखणगाव मधील पिकांचे छायाचित्र( छाया -योगेश गुंड )