ठेवीच्या रकमेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर ठेवीदाराचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:21+5:302021-04-09T04:22:21+5:30
निघोज : निघोज (ता. पारनेर) येथील सहकार महर्षी किसनराव वराळ पतसंस्थेच्या विरोधात ठेवी मिळण्यासाठी सुरू केलेले उपोषण लक्ष्मण ...

ठेवीच्या रकमेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर ठेवीदाराचे उपोषण मागे
निघोज : निघोज (ता. पारनेर) येथील सहकार महर्षी किसनराव वराळ पतसंस्थेच्या विरोधात ठेवी मिळण्यासाठी सुरू केलेले उपोषण लक्ष्मण सुरकुंडे यांनी मागे घेतले. त्यांना पतसंस्थेने दीड लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. तर उरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे लेखी आश्वासन दिले.
लक्ष्मण सुरकुंडे यांच्या किसनराव वराळ पतसंस्थेकडे साडेपाच लाखांच्या ठेवी आहेत. त्यांच्या ठेवी २०१० ला दामदुप्पट झाली होती. तेव्हापासून ते ठेवी मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे हताश होऊन त्यांनी बेमुदत उपोषण करणार असल्याचे प्रशासनाला कळविले होते. बुधवारी (दि.७) त्यांनी उपोषण सुरू केले होते. मुलगा व पत्नीच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर गुरुवारी (दु.८) दुपारी सहायक निबंधक एस.
सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी मध्यस्थी केली. त्यांनी उपचारासाठी तातडीची गरज म्हणून दीड लाख रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पतसंस्थेने दीड लाखाचा धनादेश दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे, सहकारमहर्षी किसनराव वराळ, संस्थेचे रंगनाथ वराळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक निकम, विलास लोणारे आदी उपस्थित होते.
--
०८ निघोज उपोषण