रात्री अकरानंतर हॉटेल, हातगाडी बंद

By Admin | Updated: September 19, 2014 23:39 IST2014-09-19T23:24:21+5:302014-09-19T23:39:34+5:30

अहमदनगर : शहर परिसरात एकामागून एक गुन्हे घडत आहेत. बुधवारी झालेल्या रोडे दाम्पत्याच्या खून प्रकरणामुळे पोलिसांचीही झोप उडाली आहे.

After the hotel at night, the handgun closes | रात्री अकरानंतर हॉटेल, हातगाडी बंद

रात्री अकरानंतर हॉटेल, हातगाडी बंद

अहमदनगर : शहर परिसरात एकामागून एक गुन्हे घडत आहेत. बुधवारी झालेल्या रोडे दाम्पत्याच्या खून प्रकरणामुळे पोलिसांचीही झोप उडाली आहे. शहरात रात्री ११ नंतर एकही हॉटेल, हातगाडी चालू राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी पोलिसांना दिले आहेत.
पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी गुरुवारी (दि.१८) रात्री शहर विभागाची तातडीने बैठक घेऊन पोलिसांची झाडाझडती घेतली. कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीसांची संख्या अपुरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने कारवाई करीत काही पोलीस कर्मचारी कोतवाली ठाण्यात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये घरफोड्या, वाहने चोरीला जाणे, दरोड्यांच्या घटना घडल्याने गौतम यांनी शहर विभागाच्या कामावर तीव्र नापसंती व्यक्त केली. विशेषत: कोतवाली आणि तोफखाना हद्दीतील घटना गंभीर आहेत. झालेल्या गुन्ह्यांचा तपास कामातील वेग वाढवा अन्यथा घरी बसा, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी पोलिसांना दिला आहे.
रात्री उशिरापर्यंत हॉटेल, हातगाडे सुरू राहत असल्याने चोरट्यांना शहरात छुप्या पद्धतीने फिरण्याची संधी मिळते. यावर नियंत्रण आणण्यासाठी रात्री ११ नंतर कोणतेही हॉटेल, हातगाड्या चालू राहणार नाहीत, याबाबत सक्त कारवाई करण्याचे आदेश गौतम यांनी दिले आहेत. यामध्ये कोणी हस्तक्षेप केला, तर त्यांच्यावरही कारवाई करण्यास मागे-पुढे पाहू नका. शहर-उपनगरात वाहनांची गस्त वाढविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. गस्तीचा आढावा घेण्यासाठी पोलिसांचे एक क्रॉस पथकही स्थापन करण्यात आले असल्याचे गौतम यांनी सांगितले.
विनायकनगरमधील खुनाची घटना दुर्दैवी आहे. याबाबत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मात्र अद्याप काही हाती आलेले नाही. नागरिकांनीही सतर्क राहावे, काही संशयास्पद असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे गौतम यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)

Web Title: After the hotel at night, the handgun closes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.