मृत्युनंतरही ‘ती’ची अवहेलना संपेना
By Admin | Updated: September 27, 2014 00:15 IST2014-09-27T00:04:34+5:302014-09-27T00:15:16+5:30
भिंगार : स्टोव्हच्या भडक्याने भाजून मृत्यू झालेल्या विवाहितेचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्येच सोडून पती व सासूने पळ काढल्याच्या घटनेला नऊ दिवस उलटून गेले आहेत़ तरीही अद्याप त्यांचा शोध लागला नाही़

मृत्युनंतरही ‘ती’ची अवहेलना संपेना
भिंगार : स्टोव्हच्या भडक्याने भाजून मृत्यू झालेल्या विवाहितेचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्येच सोडून पती व सासूने पळ काढल्याच्या घटनेला नऊ दिवस उलटून गेले आहेत़ तरीही अद्याप त्यांचा शोध लागला नाही़ या विवाहितेच्या अन्य नातेवाईकांचाही शोध लागत नसल्याने मृत्युनंतरही या महिलेची अवहेलना सुरुच आहे़
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ६ आॅगस्ट रोजी बुऱ्हाणनगर येथे सोनाली गणेश सोनावणे (वय २०) स्टोव्ह पेटविताना भडका उडाल्याने भाजली होती़ तिला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने या घटनेची कॅम्प पोलिसांना माहिती दिली़ पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनालीचा जबाब घेतला़ मी स्टोव्हच्या भडक्याने भाजल्याचे व यात कोणाचाही दोष नसल्याचे पोलिसांना जबाबात सांगितले़ सोनालीचा पती गणेश दिनकर सोनावणे याने दुसऱ्या दिवशी विखे हॉस्पिटल (विळद घाट) येथे तिला उपचारासाठी दाखल केले़ तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने तिची सासू रंजना दिनकर सोनावणे हिने सोनालीला सिव्हील हॉस्पिटल येथे १७ सप्टेंबर रोजी दाखल केले़ येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोनालीला मृत घोषित केले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेला असता सिव्हील हॉस्पिटलमधून पती व सासूने पळ काढला़ ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांचा शोध घेण्यात आला़ परंतु ते सापडले नाहीत़ बुऱ्हाणनगर येथे माहेरच्या नातेवाईकाची चौकशी केली असता सोनालीचा भाऊ संदीप लक्ष्मण भालेराव हा सातपूर एम़ आय़ डी़ सी़ (नाशिक) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ पोलिसांनी तेथे जाऊन त्याचा शोध घेतला़ मात्र, तोही सापडू शकला नाही़ त्यामुळे सोनालीचा मृतदेह अद्याप सिव्हील हॉस्पिटलमध्येच आहे़ सोनालीचे अन्य कोणी नातेवाईक असल्यास त्यांनी तात्काळ भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे व पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे़ (वार्ताहर)
सोनालीचा स्टोव्हच्या भडक्याने मृत्यू झाला़ तिच्या नातेवाईकांच्या शोधासाठी नाशिक व नगर जिल्ह्यात शोध मोहीम राबविली़ मात्र, कोणीही सापडू शकले नाही़ जास्त दिवस मृतदेह ठेवता येणार नाही़ त्यामुळे शनिवारी अंत्यविधी करण्याबाबत विचार सुरु आहे़
- गोरखनाथ गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भिंगार कॅम्प