भेसळयुक्त अन्नपदार्थांवर प्रशासनाची नजर
By Admin | Updated: October 18, 2014 23:47 IST2014-10-18T23:47:18+5:302014-10-18T23:47:18+5:30
अहमदनगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांपासून अन्न, औषध प्रशासनाने अन्नपदार्थ तपासणी मोहीम हाती घेतली आहे़

भेसळयुक्त अन्नपदार्थांवर प्रशासनाची नजर
अहमदनगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांपासून अन्न, औषध प्रशासनाने अन्नपदार्थ तपासणी मोहीम हाती घेतली आहे़ या मोहिमेतंर्गत शहरात एका वितरकाकडील पॅकिंग केलेले ७५ हजार तर नेवासा येथे ११ लाख रुपये किमतीचे वनस्पती तूप जप्त केले आहे़ याबाबत प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे़
अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे २० नमुने घेतले असून, तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़ या पदार्थांमध्ये भेसळ आढळून आल्यास अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे़ दिवाळी सणानिमित्त खाद्यतेल, वनस्पती तूप, रवा, बेसनपीठ, लाल तिखट, मैदा यासह विविध मिठाई बनविण्यासाठी वापरण्यात येणारा खवा व मावा याची मोठ्या प्रमाणात विक्री होते़ सणासुदीच्या काळात मात्र, या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते़ ही भेसळ रोखण्यासाठी अन्न, औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे़ संपूर्ण जिल्ह्यात ही तपासणी मोहीम सुरू आहे़ अन्नपदार्थांमध्ये प्राथमिक तपासणीत भेसळ असल्याचा संशय आला तर पुढील तपासणीसाठी नमुने घेतले जातात़
दिवाळी सणानिमित्त विविध अन्नपदार्थांची मोठी विक्री होते़ अशावेळी भेसळ होण्याची शक्यता असते़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू असून, नमुने घेण्यात येत आहेत़ ही मोहिम दिवाळीनंतरही सुरू राहणार आहे़ अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळून आल्यास अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल़
- के.एस.शिंदे, सहाय्यक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन