कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन पुन्हा सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:45+5:302021-06-20T04:15:45+5:30
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणेची ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक तालुक्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ...

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन पुन्हा सरसावले
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणेची ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक तालुक्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत गंभीरपणे संभाव्य तिसऱ्या लाटेबाबतची माहिती देत तयारी करण्याच्या सूचना दिल्या. कोरोना बाबतचा आढावा घेताना जिल्हाधिकारी बैठकीत म्हणाले, राज्यस्तरीय टास्क फोर्सने तिसरी लाटेची शक्यता व्यक्त करून तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण होते, त्यापेक्षा दुप्पट रुग्ण तिसऱ्या लाटेत असणार आहेत. जिल्ह्यात चार लाख रुग्ण बाधित होणार आहेत. त्यामध्ये आठ हजार रुग्णांना (१२ टक्के )ऑक्सिजनची आवश्यकता भासणार आहे.
सध्या नगर शहरात २०३ हॉस्पिटल आहेत. मात्र या हॉस्पिटलमधील सुविधा कमी पडणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त बेडची सुविधा कशी निर्माण होईल, यावर भर दिला जाणार आहे. कोविड केअर सेंटरमध्येच चांगल्या सुविधा, औैषधे उपलब्ध करून दिली तर तेथील रुग्ण बरे होऊन घरी जातील. कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना पुन्हा कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी व्यवस्था स्थानिक यंत्रणेने करायची आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल.
सध्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी चाचण्यांची संख्या वाढविली तर कोरोनाचे रुग्ण लगेच शोधून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होणार आहे. तिसऱ्या लाटेची तयारी ही केवळ कागदावर दिसता कामा नये, अशीही तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. हिवरेबाजार पॅटर्न प्रत्येक गावस्तरावर, शहरी भागातही राबविण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कॅन्टाेनमेंट झोन करताना तिथे पुरेसे ऑक्सिमीटर, थर्मामीटर उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
--------------
अशी होईल ऑक्सिजनची तयारी...............
रुग्णालयांनी बेडच्या क्षमतेच्या दुप्पट ऑक्सिजन बेड तयार ठेवावेत.
ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांशी खासगी रुग्णालयांनी करार करण्याच्या सूचना
खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन सिलेंडर आतापासूनच खरेदी करणार
उपलब्धता असली तरी रुग्णालयात ऑक्सिजन देणारी व्यवस्था चोख ठेवणार
जिल्ह्यातील १४ प्रकल्पातून १८ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार
ऑक्सिजन प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी डीपी सेट, जनरेटर, दुरुस्ती यंत्रणाही सज्ज करणार
खासगी रुग्णालयांनी जम्बो, ड्युरा सिलेब्र उपलब्ध करून व भरून ठेवणार
प्रत्येक खासगी व सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन बाबत प्लॉन-बी यंत्रणा
---
संभाव्य रुग्णसंख्या
पहिली लाट- ७५ हजार रुग्ण
दुसरी लाट -२ लाख रुग्ण
संभाव्य तिसरी लाट- ४ लाख रुग्ण
साध्या बेडची गरज- ६० हजार
ऑक्सिजन बेडची गरज- ८ हजार
---
लग्नामुळे वाढू लागले रुग्ण
जिल्ह्यात लग्न समारंभ, सभा, समारंभ सुरू झाले आहेत. खरेदीसाठी गर्दीही वाढत आहे. यामध्ये नियमांचे पालन करताना लोक आढळून येत नाहीत. लग्नकार्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बंदिस्त सभागृहात ५० जणांना तर लॉनवर १०० जणांना परवानगी दिली आहे. एवढ्या उपस्थितीच्या वर लग्नास गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.