चोरटी वाळूवाहतूक प्रशासनाने थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:58+5:302021-02-05T06:30:58+5:30
मुळा नदीचा हा डोंगराळ भाग असून पूर्वेकडे चास, पिंपळदरी, कौठे, घारगांव, जांबूत, साकूर, मांडवे, शेरी- ...

चोरटी वाळूवाहतूक प्रशासनाने थांबवावी
मुळा नदीचा हा डोंगराळ भाग असून पूर्वेकडे चास, पिंपळदरी, कौठे, घारगांव, जांबूत, साकूर, मांडवे, शेरी- चिखलठाण ही गावे आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या मुळा नदीत सध्या मोठ्या प्रमाणात वाळूमाफियांमार्फत उत्खनन होताना दिसत आहे. प्रशासन वाळू तस्करीकडे प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. मुळा नदीच्या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने येथे वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. ही वाळू तस्करी वाढत असून नदीकाठचे शेतकरी मात्र हैराण झाले आहेत. शेतकरी या वाळूमाफियांविरोधात बोलण्यास घाबरत असून गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या वाळूतस्करांच्या विरोधात कुणीही बोलण्यास पुढे येत नाहीत. या भागात वाळूमाफियांकडून या अगोदर महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून जिवे मारण्याचा प्रकारही घडलेला आहे.
राहुरी, पारनेर तालुक्याच्या हद्दीतून वाळू उचलून साठा करून पुढे पारनेर किंवा आळेफाट्यामार्गे पुणे जिल्ह्यात नेली जाते. हा सर्व प्रकार अगदी दिवसाढवळ्या चालतो. संगमनेर तालुक्यातील नदीकाठच्या गावातूनही भरदिवसा ढंपर नांदूर खंदरमाळमार्गे पुणे जिल्ह्यात नेली जातात. रस्त्याचीही पुरी वाट लागली आहे. वाळूमाफियांचा उद्रेक इतका वाढला आहे. रस्त्याने जाताना दादागिरी, रस्त्याने जाताना भरधाव वेगाने वाहने चालविणे, छोट्या गाड्यांना कट मारणे असे प्रकार सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने या भागातील मुळा नदीतील ही तस्करी मोडीत काढावी. आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून मोठी कारवाई करावी व नदीकाठच्या गावांना न्याय द्यावा , अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.