मुलांच्या शिक्षणासाठी आदिवासी जोडप्याची दारोदार भटकंती!
By Admin | Updated: January 23, 2017 21:36 IST2017-01-23T21:36:48+5:302017-01-23T21:36:48+5:30
पारधी समाजातील नरसिंग नचीत भोसले व मीना नरसिंग भोसले या दाम्पत्याने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी भटकंती सुरू केली आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी आदिवासी जोडप्याची दारोदार भटकंती!
बाळासाहेब काकडे /ऑनलाइन लोकमत
श्रीगोंदा, दि. 23 - आपल्या चंद्रमौळी झोपडीत शिक्षणरुपी प्रकाशाने समृद्धीची किरणे यावीत, यासाठी कोळगाव येथील पारधी समाजातील नरसिंग नचीत भोसले व मीना नरसिंग भोसले या दाम्पत्याने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी भटकंती सुरू केली आहे़ आदिवासी जोडप्याचे अनोखे स्वप्न साकार होण्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदतीचे हात पुढे केले आहेत.
पारधी समाज म्हटले की गुन्हेगार, चोरी, दरोडा पडला की पोलिसांच्या गाड्या पालावर दाखल अशी ओळख आहे़ त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात पारधी समाजाची संख्या जादा आहे़ पण काळाच्या ओघात पारधी समाजातील अनेक कुटुंब बदलली आहेत़ काहींना शेतीचा, काहींना श्रमजीवी जीवनाचा तर शिक्षण घेण्याचा लळा लागला आहे़ याचे चांगले परिणाम जाणवू लागले आहेत, हे नाकारून चालणार नाही़
कोळगाव येथील नरसिंग भोसले व मीना भोसले या जोडप्याने अजय व सुरज या दोन मुलांवर कुटुंब नियोजन केले़ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून लांब राहून समाजाच्या प्रवाहात सामील झाले़ सुरज व अजयला शाळा शिकविण्याचा संकल्प केला़
अजयने वाघोली येथील ज्ञानबा सोपान मोझे महाविद्यालयात बी़ फार्मसीत प्रवेश घेतला असून सुरज हा पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमशाळेत इयत्ता दहावीत शिकत आहे़
नरसिंग व मीना यांची मोलमजुरी करून मुलांसाठी धडपड सुरू आहे़ मीना कधी मुंबईला मुलांच्या शिक्षणासाठी भिक्षा मागते़ मीनाने मुलांच्या शिक्षणासंदर्भात मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत पत्र तयार केले आहेत़ हे पत्र वाचून मीनाला मुंबईकर मदतीचा हात देतात़ तसेच कोळगावमधील डॉ़ अनिल क्षीरसागर व डॉ़ महेश शेलार यांनी डॉक्टर संघटनेच्या माध्यमातून मदत मिळवून दिली आह़े त्यामुळे या नरसिंग व मीनाच्या धडपडीला बळ मिळाले आहे.
अजयला मोझे महाविद्यालयात प्रवेश मिळाला, पण वसतिगृहाची फी भरण्यासाठी पैसे नव्हते़ नरसिंगने मदतीचा हात मिळावा म्हणून मंत्री, अभिनेते, खासदार, आमदार, समाजकल्याण अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला, पण कोणीच दखल घेतली नाही़ महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्थेचे सचिवअनंत झेंडे यांची भेट घेतली़ झेंडे यांनी वाघोली येथील व्यापारी कीर्ती ओसवाल यांना पत्र दिले़ ओसवाल यांनी अनंत झेंडेंच्या पत्राची दखल घेतली आणि अजयची चार वर्षांची सुमारे सव्वा लाख फी भरण्याचा निर्णय घेतला़ कीर्ती ओसवाल यांच्या रूपाने आधार देणारा देवमाणूसच भेटला
मी दहावी नापास, मला लहानपणापासून चांगल्या माणसांची संगत करण्याची सवय लागली़ मी चांगला वागतो म्हणून समाजाने मला जवळ केले़ मुले शिकली तर आपल्या कुटुंबाची प्रगती होईल, अशी आमची पती-पत्नीचीधारणा होती़ दोन मुलावर आॅपरेशन केले़ अजय व सुरजला समाजाने केलेल्या मदतीवर शिकविण्याचे काम सुरू आहे़ मुलांना चांगली नोकरी लागेल, तो क्षण आमच्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल.
- नरसिंग भोसले, कोळगाव