अहमदनगरमध्ये महापौरांकडून तक्रारींची दखल; अखेर जलतरण तलाव होणार सुरू
By अरुण वाघमोडे | Updated: May 14, 2023 17:14 IST2023-05-14T17:12:58+5:302023-05-14T17:14:19+5:30
जलतरण तलावात मुलांसाठी बेबी पुल, महिलांसाठी चेंजिंग रुम, नागरिकांना बसण्याची व्यवस्था तसेच तलावातील फरशी, पाणी, स्वच्छतागृह हे सर्व अद्यावत करण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

अहमदनगरमध्ये महापौरांकडून तक्रारींची दखल; अखेर जलतरण तलाव होणार सुरू
अहमदनगर: देखभाल दुरुस्तीअभावी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला सिद्धीबाग येथील महापालिकेचा जलतरण तलाव येत्या पंधरा दिवसांत सर्व सोयीसुविधांसह सुरू करा, असे आदेश महापौर रोाहिणी शेंडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या जलतरण तलावात मुलांसाठी बेबी पुल, महिलांसाठी चेंजिंग रुम, नागरिकांना बसण्याची व्यवस्था तसेच तलावातील फरशी, पाणी, स्वच्छतागृह हे सर्व अद्यावत करण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
महापौर शेंडगे यांनी शनिवारी या जलतरण तलावाची पाहणी केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, जलअभियंता परिमल निकम, व्यवस्थापक गणेश कुलकर्णी आदीउपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून मनपाचा सिद्धीबाग येथील जलतरण तलाव दुरुस्ती अभावी बंद असल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली. या तलावात नियमित पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. उन्हाळ्यात ही संख्या वाढते. तसेच पोहण्याचे प्रशिक्षण, स्पर्धाही या ठिकाणी होत. परंतु ऐन उन्हाळ्यात हा तलाव दुरुस्तीअभावी बंद असल्याने नागरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर महपौर शेंडगे यांनी तलावाची पाहणी करत तो सुरू करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.