भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST2021-05-26T04:22:18+5:302021-05-26T04:22:18+5:30
अहमदनगर : बाजार समितीसह शहर व परिसरात भाजीपाला व फळे विक्रीच्या नियोजनबाबतचा कृती आराखडा दोन दिवसांत सादर करण्याच्या सूचना ...

भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी कृती आराखडा
अहमदनगर : बाजार समितीसह शहर व परिसरात भाजीपाला व फळे विक्रीच्या नियोजनबाबतचा कृती आराखडा दोन दिवसांत सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी बाजार समिती व संघटनांना केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे यावेळी सांगण्यात आले.
महापालिका आयुक्त गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उपजिल्हा निबंधक दिग्विजय आहेर, कृषी विभागाचे उन्मेश डोईफोडे, भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या वतीने बहिरनाथ वाकळे, संजय झिंजे, शाकीर शेख, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे आदी उपस्थित होेते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बाजार समित्या सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात भाजीपाला विक्री करण्यास परवानगी देण्याची भाजीपाला विक्रेता संघटनांची मागणी आहे. संघटनांच्या मागणीबाबत बैठकीत चर्चा झाली. तालुक्यात भाजीपाला विक्रीस परवानगी आहे. त्यानुसार शहरातही परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर नगर शहरातील रुग्ण संख्या कमी झाली असून, तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही.त्यामुळे भाजीपाल्याचा लिलाव, ठोक आणि किरकोळ विक्रीला तूर्तास परवानगी देता येणार नाही. राज्य शासनाकडून येत्या १ जूनपर्यंत निर्णय होईल. तोपर्यंत बाजार समितीसह भाजीपाला विक्रेता संघटनांनी नियमांचे पालन करून गर्दी न करता भाजीपाल्याचा लिलाव व विक्री कशी करता येईल, याबाबत कृती आराखडा तयार करावा. हा आराखडा अपत्ती व्यवस्थापन समितीसमोर सादर केला जाईल. या समितीने मान्यता दिल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्त गोरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.
....
पालकमंत्र्यांसमोर आराखडा मांडणार
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित येत्या २८ मे रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत बाजार समिती, कृषी आणि संघटनांनी सादर केलेल्या आराखड्यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत शहरातील भाजीपाला व फळेविक्रीस परवानगी मिळाल्यास आराखड्यानुसार नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.