निवडणूक भरारी पथकाची कारवाई : ८ लाखांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:01 IST2019-04-02T18:01:44+5:302019-04-02T18:01:47+5:30
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षांतर्गत असलेल्या भरारी व स्थिर सनिरीक्षण पथकाने केलेल्या वाहन तपासणी मोहिमेत शेवगाव तालुक्यातील सामनगाव परिसरात एका वाहनातून ८ लाख रूपये जप्त करण्यात आले.

निवडणूक भरारी पथकाची कारवाई : ८ लाखांची रोकड जप्त
शेवगाव : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षांतर्गत असलेल्या भरारी व स्थिर सनिरीक्षण पथकाने केलेल्या वाहन तपासणी मोहिमेत शेवगाव तालुक्यातील सामनगाव परिसरात एका वाहनातून ८ लाख रूपये जप्त करण्यात आले. ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केल्याची माहिती शेवगाव तहसीलच्या निवडणूक शाखेतून देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीसाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यात ३ स्थिर सनिरीक्षण पथक तसेच दोन फिरत्या भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय तीन व्हिडीओ सनिरीक्षण पथक तसेच एक व्हिडीओ पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकापैकी एका पथकाने तालुक्यातील शेवगाव नगर राजमार्गावर केलेल्या वाहन तपासणी मोहिमेत सामनगाव परिसरात एका कारमधून ८ लाख रुपयांची रोख रक्कम जमा केल्याची घटना रविवारी घडली. पथकाने केलेल्या कारवाईची माहिती मिळताच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे खर्च नियंत्रण निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने ही रोकड सील करून जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. दरम्यान मुलाच्या लग्नानिमित्त सोन्याचे दागिने करण्यासाठी ही रक्कम बँकेतून काढल्याची माहिती संबंधित व्यक्तीने पथकाला दिली. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रेही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविली. कागदपत्रांची शहानिशा करून त्यावर निर्णय देण्याचा अधिकार जिल्हास्तरीय समितीकडे असल्याने याबाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती देण्याचे संबंधितांनी सांगितल्याची माहिती तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी दिली.