चौकशी अहवालानंतर टँकर घोटाळ्यातील दोषींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST2021-05-27T04:23:00+5:302021-05-27T04:23:00+5:30
श्रीगोंदा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या काळात झालेल्या टँकर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल येताच दोषींच्या विरोधात कारवाई ...

चौकशी अहवालानंतर टँकर घोटाळ्यातील दोषींवर कारवाई
श्रीगोंदा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या काळात झालेल्या टँकर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल येताच दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
बुधवारी मुश्रीफ यांनी श्रीगोंदा येथे कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्ह्यातील टँकर घोटाळ्यांबाबत ‘लोकमत’ने अनेकदा पुराव्यांसह बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. संबंधितांवर कारवाई करावी यासाठी अनेकांनी मागणीही केली आहे. त्यानुसार शासनाने ३० सप्टेंबरला चौकशी समितीही गठित केली आहे. मात्र, या समितीने अद्याप अहवाल दिलेला नाही. याबाबत मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. त्यानुसार चौकशी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर त्यानुसार कारवाई होईल. याशिवाय जिल्ह्यातील शेततळ्यांच्या घोटाळ्याचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वाळूतस्करीबाबत तालुकास्तरावरून माहिती मागवत असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
श्रीगोंदा तालुक्यात कोरोनामुळे १४५ जणांचा मृत्यू झाल्याचे आढावा बैठकीत प्रशासनाने जाहीर केले. त्यावर उपस्थित काही कार्यकर्त्यांनी तालुक्यातील कोराेनाच्या मृत्यू आकडेवारीवर आक्षेप घेतला. त्यावेळी मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशा सूचना केल्या. बबनराव पाचपुते म्हणाले, आढावा घेण्यास उशीर झाला. अधिकाऱ्यांनी कोरोनात उत्तम काम केले आहे. त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील. कोरोना मृत्यू आकडेवारीच्या संशयाबाबत चौकशी करावी.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्याचा तर प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी तालुक्याची कोरोना स्थिती सांगितली. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनोहर पोटे, अण्णासाहेब शेलार, शंकर पाडळे, तहसीलदार प्रदीप पवार, प्रशांत दरेकर, स्मितल वाबळे, राजेंद्र म्हस्के, दीपक भोसले, प्रशांत गोरे आदी उपस्थित होते.
---
कुकडीचे नियोजन गरजेचे..
घनश्याम शेलार म्हणाले, पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. श्रीगोंद्यातील कोविड सेंटर चालकांचा सत्कार करण्यासाठी वेळ द्यावा. तसेच कुकडीच्या आवर्तनाचा प्रश्न गंभीर आहे. या आवर्तनात सुसूत्रता आणण्याची गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.