तिघा दरोडेखोरांविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:58+5:302021-06-02T04:16:58+5:30
टोळी प्रमुख संदीप दिलीप कदम (वय २५, रा. डोंगरगण, ता. नगर), शशिकांत सावता चव्हाण (वय २२, रा. अंबीजळगाव, ता. ...

तिघा दरोडेखोरांविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई
टोळी प्रमुख संदीप दिलीप कदम (वय २५, रा. डोंगरगण, ता. नगर), शशिकांत सावता चव्हाण (वय २२, रा. अंबीजळगाव, ता. कर्जत) व सोमनाथ रामराव खलाटे (रा. आष्टी, जि. बीड), असे मोक्का लावलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. या तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे, तसेच तोफखाना, राहुरी, लोणी आदी पोलीस ठाण्यांतही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोक्का कारवाईअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षकांनी हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहेत.
इमामपूरच्या घाटासह शेंडी बायपास व परिसरात वाहन चालकांना अडवून शस्त्राचा धाक दाखविणे, त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील पैसे काढून घेणे, अशी कृत्ये संदीप कदम व त्याचे साथीदार करीत होते. दरम्यान, हे तिघे आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी एमआयडीसी पोलीस जिल्हा न्यायालयात अर्ज करणार आहेत.
.......
कुख्यात गुन्हेगारांना दणका
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर टू प्लस योजनेंतर्गत सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. सराईत गुन्हेगार, दरोडेखोर व कायदा आणि सुव्यवस्थेला वारंवार बाधा निर्माण करणाऱ्या टोळ्यांविरोधात सध्या धडक कारवाई सुरू आहे.