नियम तोडणाऱ्या साडेचार हजार जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:26 IST2021-02-25T04:26:17+5:302021-02-25T04:26:17+5:30
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व्यवहार सुरळीत होऊन सार्वजनिक ठिकाणी पूर्वीप्रमाणे गर्दी वाढली. वाढत्या गर्दीसह कोरोनाचे रुग्णही वाढू लागल्याने प्रशासनाने ...

नियम तोडणाऱ्या साडेचार हजार जणांवर कारवाई
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व्यवहार सुरळीत होऊन सार्वजनिक ठिकाणी पूर्वीप्रमाणे गर्दी वाढली. वाढत्या गर्दीसह कोरोनाचे रुग्णही वाढू लागल्याने प्रशासनाने लॉकडाऊन टाळायचे तर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. रस्त्यावर, बाजारात फिरताना, दुचाकी चालविताना बहुतांशी जण मास्क वापरत नाहीत. कार्यक्रमात सोलश डिस्टन्सिंगचे पालन होत नाही, लग्नसोहळ्यातही गर्दी होत असल्याने पोलिसांनी नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. १९ ते २४ फेब्रुवारीदरम्यान पोलिसांनी जिल्ह्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, सर्वजनिक ठिकाणी थुंकणे असे कृत्य करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
सहा दिवसांत यांना झाला दंड
मास्क लावला नाही - ४ हजार ३७५ जणांना ४ लाख ३९ हजार रुपयांचा दंड
सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही - १२२ जणांना १२ हजार २०० रुपयांचा दंड
सार्वजनिक ठिकाणी थुंकले - ९२ जणांना १२ हजार ६०० रुपयांचा दंड
दुकानदारांनीही घ्यावी आता काळजी
दुकानांमध्ये दिवसभरात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची मोठी ये-जा सुरू असते. दुकानदारांचा दिवसभरात अनेक लोकांशी संपर्क येतो. अशावेळी प्रत्येक दुकानदाराने काळजी घेणे गरजेचे आहे. शहरातील बहुतांशी दुकानदार व छोटे-मोठे व्यावसायिक हॅन्डग्लोज घालत नाहीत तसेच मास्कही लावत नसल्याचे दिसून आले आहे.
फोटो ओळी- दुचाकीवरून फिरताना बहुतांशी जण तोंडाला मास्क लावत नाहीत.