‘वस्तुस्थिती अहवालानंतर कारवाई
By Admin | Updated: July 4, 2014 01:21 IST2014-07-04T01:18:23+5:302014-07-04T01:21:56+5:30
अहमदनगर: जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांचे ‘स्टींग’ करून ‘लोकमत’ने तेथील कारभार उजेडात आणला. त्याची दखल जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गुरूवारी घेतली.

‘वस्तुस्थिती अहवालानंतर कारवाई
अहमदनगर: जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांचे ‘स्टींग’ करून ‘लोकमत’ने तेथील कारभार उजेडात आणला. त्याची दखल जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गुरूवारी घेतली. संबंधितांचा वस्तुस्थिती अहवाल मागविण्यात येईल. अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल असे कवडे यांनी सांगितले. दरम्यान, या स्टिंगची चर्चा आज दिवसभर महसूल वर्तुळात होती. तलाठ्यांच्या कारभाराला वैतागलेल्या सामान्य शेतकरी आणि नागरिकांनी मात्र ‘लोकमत’च्या स्टींगचे कौतुक करत प्रश्न ऐरणीवर आणल्याबद्दल आभार मानले.
जिल्ह्यातील ९० तलाठी कार्यालयाचे ‘स्टींग’ करून ‘टीम लोकमत’ने तेथील कारभारावर प्रकाशझोत टाकला. हे स्टींग जिल्हाभर चर्चेचा विषय झाला. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी तातडीने या वृत्ताची दखल घेतली. स्टींगमध्ये कार्यालयात नसलेले तलाठी भाऊसाहेब नेमके कोठे होते याची वस्तुस्थिती सांगणारा अहवाल मागविण्यात येईल. हा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. शासकीय कामाच्या नावाखाली कोणी खासगी काम करत असेल तर ते चुकीचे असून त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. सजेच्या ठिकाणी थांबण्याचे दिवस तलाठ्यांना निश्चित करून दिलेले आहेत. त्या दिवशी त्याने तेथे उपस्थित असणे अनिवार्य आहे. निश्चित करून दिलेल्या वारी तलाठी कार्यालयात असतात की नाही याची खातरजमा केली जाईल. त्यातून सुधारणा होणे अपेक्षित आहे. दोन महिन्यापूर्वीच तलाठ्यांना कार्यालयात थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. तहसील कार्यालयात सातबारा संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. त्या कामानिमित्त काही तलाठी तहसील कार्यालयात असतात. त्यामुळे ते कार्यालयात नसतील. मात्र शासकीय कामाव्यतिरिक्त कार्यालयाबाहेर असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी कवडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लोकमत’चे आभार अन् कौतुक
जिल्ह्यातील तलाठी कार्यालयाचे स्टींग करून त्रासाला वाचा फोडल्याबद्दल शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालयात फोन करून आभार मानले. या स्टींगचे कौतुक केले. तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. वेळेवर तलाठी भेटत नाही. शाळेसाठी लागणारे दाखले वेळेत भेटले नाहीतर मुलांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तलाठ्यांना शिस्त लावणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी ‘लोकमत’कडे मांडले.