चुलत बहिणीच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:46+5:302021-07-09T04:14:46+5:30
अहमदनगर : चुलत बहिणीचा विवाह होऊ नये, तसेच तिच्यावर वाईट नजर ठेवून आरोपीने बहिणीस राॅकेल टाकून पेटवले. त्यात तिचा ...

चुलत बहिणीच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप
अहमदनगर : चुलत बहिणीचा विवाह होऊ नये, तसेच तिच्यावर वाईट नजर ठेवून आरोपीने बहिणीस राॅकेल टाकून पेटवले. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१६मध्ये ही घटना नगर तालुक्यातील कामगार येथे घडली होती.
मारुती अर्जुन ठोकळ (वय ३५, रा. कामरगाव, ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी याची चुलत बहीण रुपाली (नाव बदलले आहे) हिच्यावर वाईट नजर होती. २०१६मध्ये रुपालीचे आई-वडील तिच्यासाठी स्थळ शोधत होते. त्यावेळी तिचा विवाह होऊ नये म्हणून आरोपी रुपालीला सतत फोन करून त्रास देत होता. २४ मार्च २०१६ रोजी घरात कोणीच नसल्याचे पाहून आरोपी रुपालीच्या घरात घुसला व त्याने तुला केलेले फोन वडिलांना का सांगते, असे विचारत रुपालीशी वाद घातला. त्यातून त्यांच्यात झटापट झाली. त्यानंतर आरोपीने घरातील राॅकेल रुपालीच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. तिने आरडाओरड केल्याने घाबरून त्याने तिला गोधडीच्या साहाय्याने विझविले. परंतु तिला दम देऊन गप्प केले. स्टोव्हचा भडका होऊन तू भाजली, असे सगळ्यांना सांग, नाहीतर तुझ्या घरच्यांचे वाटोळे करीन, असे धमकावत आरोपीनेच रुपालीला नगरला खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे नगर तालुका पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
न्यायालयात याप्रकरणी पोलीस अधिकारी, उपचार करणारे डाॅक्टर यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. याप्रकरणी सहायक सरकारी वकील केदार केसकर यांनी युक्तिवाद केला. त्याआधारे जिल्हा न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी आरोपीस दोषी धरत आजन्म कारावासाची व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.