बनावट नोटाप्रकरणातील आरोपीचा रुग्णालयात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 18:56 IST2017-07-01T18:56:36+5:302017-07-01T18:56:36+5:30

२० जून रोजी आष्टीत बनावट नोटा बनविणाऱ्या शहनवाज खान यास पकडले होते.

The accused in the fake notes died in hospital | बनावट नोटाप्रकरणातील आरोपीचा रुग्णालयात मृत्यू

बनावट नोटाप्रकरणातील आरोपीचा रुग्णालयात मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : बनावट नोटाप्रकरणातील आरोपी भरत लबडे (वय २७, रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) या आरोपीचा बीड जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बीड जिल्हा दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक श्रीकांत उबाळे यांनी २० जून रोजी आष्टीत बनावट नोटा बनविणाऱ्या शहनवाज खान यास पकडले होते. त्याने छापलेल्या नोटा लोणी व्यंकनाथ येथील भरत लबडे याला स्वस्तात विकल्या व लबडे नोटा चलनात आणत होता. लबडे याला लोणी व्यंकनाथ परिसरात अटक केली होती. दरोडा प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपींना आष्टी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांच्याकडून तब्बल २ लाख १५ हजारांच्या १००, ५००, २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती.
शुक्रवारी दुपारी लबडे याच्या पोटात वेदना होऊ लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. कारागृह प्रशासनाने अद्याप त्याच्या मृत्यूचा खुलासा केलेला नाही.

Web Title: The accused in the fake notes died in hospital