कर्जत-कुळधरण रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:03+5:302021-02-05T06:35:03+5:30
कर्जत : कर्जत-कुळधरण रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच असून अल्प कालावधीतच चारचाकी व दुचाकी अशी १७ वाहने उलटून येथे अपघात ...

कर्जत-कुळधरण रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच
कर्जत : कर्जत-कुळधरण रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच असून अल्प कालावधीतच चारचाकी व दुचाकी अशी १७ वाहने उलटून येथे अपघात झाले आहेत. असे असतानाही याकडे प्रशासन अथवा ठेकेदार कोणाचेही लक्ष नाही. रस्त्याचे काम तर अत्यंत संथगतीने सुरू आहे.
अपघातानंतर रस्त्यालगतचे रहिवासी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवत आहेत. मात्र, अपघातांची मालिका काही थांबत नाही. वाहनचालक आपला जीव मुठीत धरून वाहने चालवत आहेत. कर्जत-कुळधरण हा रस्ता दुपदरी व्हावा, रस्त्याच्या व परिसराच्या वैभवात भर पडावी, यासाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी प्रयत्न करून राज्य सरकारकडून या रस्त्याच्या कामासाठी सहा कोटी रुपये मंजूर केले. यामध्ये रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण ही कामे केली जाणार आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे. या कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मटेरियल टाकले होते. शिवाय साईडपट्ट्या भरताना रस्त्यालगत खोदाई करून मुरुम व माती उचलली आहे. यामुळे खड्डे पडले आहेत. कर्जत ते वडगाव तनपुरे या दरम्यान हे काम सुरू आहे. काही काम पूर्ण झाले आहे तर काही अपूर्ण आहे. काम सुरू आहे तोपर्यंत तीनवेळा खड्डे बुजवून घेतले आहेत. तरीही खडी उखडली आहे, खड्डे पडले आहेत. रस्त्यावर टाकलेली कच दोन्ही बाजूला गोळा झाली आहे. यामुळे यावरून वाहने घसरत आहेत. या महिन्यात या रस्त्यावर सद्गुरु डेअरी ते वडगाव तनपुरेदरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनांचे लहान- मोठे १७ अपघात झाले आहेत.
राम शिंदे यांनी गुणवत्ता नियंत्रण विभाग यांच्याकडे मंजूर अंदाजपत्रकानुसार हे काम झाले नाही, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
---------
कर्जत ते कुळधरण रस्त्याचे काम सुरू आहे. येथे अपघात होत आहेत. मात्र चालकवाहन वेगात वाहने चालवितात त्यामुळे अपघात होत आहेत.
-अमित निमकर,
उपअभियंता, सा. बां. कर्जत
(फोटो ३० कर्जत अपघात)
कर्जत-कुळधरण रस्त्यावरील अपघातात उलटलेली कार.