भरधाव कारने उडवले, दुचाकीस्वाराचा मृत्यू; कारचालकाने निष्काळजीपणा
By शिवाजी पवार | Updated: January 15, 2024 17:33 IST2024-01-15T17:33:19+5:302024-01-15T17:33:45+5:30
श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाजवळ कार व दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये निपाणी वडगाव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

भरधाव कारने उडवले, दुचाकीस्वाराचा मृत्यू; कारचालकाने निष्काळजीपणा
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाजवळ कार व दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये निपाणी वडगाव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कारचालकाने निष्काळजीपणाने भरधाव वेगाने जात इतर दुचाकी चालकांच्या काळजाचा ठोका चुकवला. मयताचे नाव युनूस अब्दुल सय्यद (वय ५०) असे आहे.
सय्यद हे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस होते. सोमवारी सकाळी ते कामावर जात असताना अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीरामपूरहून नेवासे रस्त्याने जाणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने (एमएच २० सीडब्ल्यू ७५७८) त्यांना धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिस हवालदार संतोष परदेशी, पोलिस नाईक किरण टेकाळे, हवालदार प्रवीण कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी क्रेनच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. मृत सय्यद यांच्या नातेवाइकांनी आक्रोश करत वाहनचालकास ताब्यात देण्याची मागणी केली. प्रसंगावधान राखत पोलिसांनी कारचालकाला घटनास्थळावरून पोलिस ठाण्यात आणले. सोमवारी अपघात झाला, तेथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.