स्थायी समिती सभापतीपदासाठी गाठीभेटींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:35+5:302021-02-06T04:38:35+5:30
अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सदस्य नियुक्तीची सभा निघाल्याने सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदस्य नियुक्ती आठ दिवसांवर ...

स्थायी समिती सभापतीपदासाठी गाठीभेटींना वेग
अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सदस्य नियुक्तीची सभा निघाल्याने सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदस्य नियुक्ती आठ दिवसांवर असली तरी सभापतीपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. काहींनी तर विद्यमान सदस्य व संभाव्य सदस्यांशी संपर्क साधला आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिका स्थायी समितीत निम्मे आठ सदस्य नियुक्त करण्यासाठी बुधवारी सभा बोलाविण्यात आली आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीतील मोठा अडथळा यामुळे दूर झाला आहे. सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर तत्काळ प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवून कोणत्याही क्षणी सभापतीपदाची निवडणूक लागू शकते. राष्ट्रवादीकडून कुमार वाकळे, अविनाश घुले, तर सेनेकडून बाळासाहेब बोराटे, श्याम नळकांडे, विजय पटारे हे इच्छुक आहेत. याशिवाय भाजपकडून स्वप्निल शिंदे, तर काँग्रेसकडून सुप्रिया जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे हे स्थायी समितीतून निवृत्त झाल्याने त्यांना आधी सदस्य व्हावे लागेल. त्यामुळे राष्ट्रवादी वाकळे यांना पुन्हा संधी देणार का, हाही प्रश्न आहेच. त्यात अविनाश घुले व डॉ. सागर बोरुडे हे दोघे स्थायी समितीत आहेत. त्यांचा सभापतीपदासाठी विचार होऊ शकतो. सेनेकडूनही सभापतीपदावर दावा केला जात आहे. सेनेकडून बोराटे, पटारे, नळकांडे हे इच्छुक आहेत. बसपाचे गटनेते मुद्दसर शेख यांनी स्वत:चेच नाव दिल्यास अश्विनी सचिन जाधव यांचा पत्ता कट होऊ शकतो. परंतु, जाधव यांनी स्थायीत येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून, सदस्यपद मिळाल्यास जाधव हेही सभापतीसाठी प्रयत्न करू शकतात, अशीही चर्चा आहे.
...
सभपती निवडीला महापौरपदाच्या निवडणुकीची झालर
स्थायी समिती सभापती निवडणुकीला पुढील महापौर निवडणुकीची झालर आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत येत्या जूनमध्ये संपुष्टात येणार आहे. महापालिकेत सेनेचे २३, तर राष्ट्रवादीचे १९ सदस्य आहेत. स्थायी समिती सभापतीची राजकीय गणिते महापौरपदाच्या निवडणुकीवर अवलंबून असणार आहेत. त्यामुळे प्रथमच सभापतीपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.