अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:51+5:302020-12-06T04:21:51+5:30
अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी
अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिला.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील यांनी काम पाहिले. नगर शहरात ही घटना घडली होती. अफसर लतीफ सय्यद (वय २६, रा.अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील दुसरी आरोपी मुन्नी ऊर्फ शमीना लतीफ सय्यद (वय ५२) हिला न्यायालयाने १ महिना साधी कैद व ५०० रुपये दंड ठोठावला. सर्व दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपी सय्यद याने १५ सप्टेंबर २०१८ रोजी सदर अल्पवयीन मुलीला मारहाण करीत तिचा विनयभंग केला होता. यावेळी मुलीची आरडाओरड ऐकून मुन्नी ऊर्फ शमीना सय्यद घटनास्थळी आली होती. यावेळी तिने पीडित मुलीस धमकावले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी सय्यद याने पुन्हा पीडित मुलीस उचलून त्याच्या घराच्या छतावर नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने ही घटना समोर आली. याबाबत पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची प्रथम जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांची बदली झाल्याने या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश आणेकर यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. समोर आलेले साक्षी-पुरावे व ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी लक्ष्मण काशिद व बी. बी. बांदल यांनी सहकार्य केले.