दर शुक्रवारी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:20+5:302021-06-21T04:15:20+5:30
शेवगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन व्हावे, व्यवस्थित निगा राखली जावी, छत्रपतींचे विचार सर्वसामान्यांच्या मनात रुजावेत, ...

दर शुक्रवारी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक
शेवगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन व्हावे, व्यवस्थित निगा राखली जावी, छत्रपतींचे विचार सर्वसामान्यांच्या मनात रुजावेत, याकरिता शिवस्मारक समितीच्या संकल्पनेतून आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या शिवभक्तांच्या हस्ते शिवमूर्तीला अभिषेक केला जातो. मूर्तीचे पावित्र्य व निगा राखण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
छत्रपतींच्या मूर्तीला १००वा अभिषेक शिवाजीराव काकडे, तर १०१वा अभिषेक संभाजी दहातोंडे यांच्या हस्ते नुकताच घालण्यात आला. महापुरुषांच्या पुतळ्यांच्या निर्मितीसाठी आंदोलने केली जातात. पुतळे उभारले जातात. परंतु, पुतळा उभारल्यानंतर त्याकडे जयंती अथवा पुण्यतिथीलाच लक्ष जात असते. इतर दिवशी हे पुतळे दुर्लक्षितच राहतात. त्यांची जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी प्रशासनाकडून स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट तसेच स्मरण केले जाते.
मात्र या विचारसरणीला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींचा पुतळा अपवाद ठरला आहे. शहरातील शिवभक्त व शिवस्मारक समितीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजना आखण्यात येऊन आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक केला जातो. या सोहळ्याला शहरातील सर्व शिवभक्त एकत्र येऊन स्वच्छता करतात.
उपक्रमाबाबत डॉ. नीरज लांडे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. जुन्या तलाठी कार्यालयाशेजारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना व सुशोभीकरण करण्यासाठी, लोकसहभागातून आपण चळवळ उभी व्हावी या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करत आहोत. यातून शिवप्रेमींना एकत्र करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे मूर्तीचे पावित्र्य व निगा राखली जाते. जे लोक अभिषेक करण्यास इच्छुक आहेत. त्यांना दर शुक्रवारी हा मान दिला जातो. ही प्रथा अशीच अखंडितपणे पुढेही सुरू राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.