महिन्याला १५ लाखांचे आमिष, चार कुटुंबीयांना ५ कोटींना गंडवले
By शिवाजी पवार | Updated: January 15, 2024 18:05 IST2024-01-15T18:05:13+5:302024-01-15T18:05:34+5:30
काच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल, पीडितांमध्ये व्यावसायीक, डॉक्टरांचा समावेश

महिन्याला १५ लाखांचे आमिष, चार कुटुंबीयांना ५ कोटींना गंडवले
श्रीरामपूर (जि. अहमदनगर): महिन्याला १० ते १५ लाख रूपयांचे आमीष दाखवून तब्बल ५ कोटी रूपयांची फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी मुश्ताक बनेमियाँ शेख (वय ४२,रा.डावखर रस्ता, श्रीरामपूर) यांनी शहर पोलिस ठाण्या फिर्याद दाखल केली. त्यावरून आदिल बहोद्दिन जहागीरदार, त्यांची पत्नी, इम्रान बहोद्दिन जहागीरदार, बहोद्दिन जहागीरदार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी शेख यांचे फर्निचरचे दुकान व सॉ मीलचा व्यवसाय आहे. शेअर मार्केटमधून महिन्याला ट्रेडिंग करून पैसे कमवून देण्याचे आमीष शेख यांना आरोपींनी दाखविले. बहोद्दिन यांनी प्रसंगी स्वत:च्या शेतीची विक्री करून पैसे देऊ अशी ग्वाही दिली. त्यामुळे शेख आमिषाला बळी पडले. छत्रपती संभाजीनगर व श्रीरामपूर येथील काही व्यापारी व डॉक्टरांनी आपल्याकडे गुंतवणूक केल्याचे जहागीरदार यांनी शेख यांना सांगितले. त्यामुळे शेख यांचा विश्वास बसला. त्यांनी १५ लाख रुपये गुंतवणुकीसाठी आरोपींकडे दिले. तत्पूर्वी करारनामा पूर्ण केला. आरोपींनी शेख यांना पाच लाख रुपयांचे तीन धनादेश सुपूर्द केले. अवघ्या तीन दिवसांमध्ये एक लाख रुपये रोख स्वरुपात दिले. त्यामुळे मुश्ताक शेख समाधानी होते. २७ फेब्रुवारी २०२३मध्ये शेख यांनी आणखी २० लाख रुपयांची गुंतवणूक केली. २४ एप्रिल २०२३ मध्ये शेख यांनी नव्याने ५० लाख रुपये आरटीजीएसद्वारे आरोपींच्या खात्यात जमा केले. या व्यवहारांच्या वेळी करारनामा करण्यात आला. आरोपी काही ठराविक रक्कम शेख यांना देत गेले. त्यामुळे त्यांनीही गुंतवणूक वाढवत नेली.
मात्र, एप्रिल महिन्यानंतर आरोपींनी एकही रुपया शेख यांना परत केला नाही. अनेकदा मागणी करूनही शेअर मार्केटमधील ट्रेडिंग बंद आहे. चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगितले. चीनमधील कंपनीतून परतावा मिळणार असून त्यातून पैसे परत करू, असे आश्वासन देण्यात आले. ४ जुलैला शेख हे आरोपींच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. त्यामुळे शेख यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. छत्रपती संभाजीनगर तसेच श्रीरामपूर येथील चार व्यावसायीकांची ५ कोटी ८ लाख रूपयांची जहागीरदार कुटुंबीयांनी फसवणूक केली आहे, असे मुश्ताक शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे.