ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली खाली सापडून १९ वर्षीय युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2022 23:14 IST2022-12-16T23:14:19+5:302022-12-16T23:14:39+5:30

वैष्णवी साहेबराव गुंजाळ (वय १९, रा. निर्मलनगर, गुंजाळवाडी, ता संगमनेर) असे या अपघातातील मयत युवतीचे नाव आहे.

A 19-year-old girl died after being found under a tractor-trolley transporting sugarcane | ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली खाली सापडून १९ वर्षीय युवतीचा मृत्यू

ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली खाली सापडून १९ वर्षीय युवतीचा मृत्यू

संगमनेर : उसाची वाहतूक होत असलेल्या ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉलीखाली सापडून दुचाकीने घरी जाणाऱ्या १९ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. १६) संध्याकाळी ७ ते साडेसात वाजेच्या सुमारास शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर जुन्या पोस्ट ऑफिससमोर घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

वैष्णवी साहेबराव गुंजाळ (वय १९, रा. निर्मलनगर, गुंजाळवाडी, ता संगमनेर) असे या अपघातातील मयत युवतीचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, वैष्णवी गुंजाळ ही नवघर गल्ली परिसरातून दुचाकीवर घरी जात होती. तेथून काही अंतर पुढे गेल्यानंतर उसाची वाहतूक होत असलेल्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडलेल्या होत्या. हे वाहन रस्त्याने जात होते. त्याखाली वैष्णवी गुंजाळ सापडली. तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी शहर पोलिसांना कळविले. पोलिस उपनिरीक्षक विजय परदेशी हे पोलिस कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. तिचा मृतदेह कुटीर रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला.

Web Title: A 19-year-old girl died after being found under a tractor-trolley transporting sugarcane