हवाला रॅकेटमधील ९७ लाखांची रोकड जप्त
By Admin | Updated: May 14, 2016 23:50 IST2016-05-14T23:45:55+5:302016-05-14T23:50:30+5:30
अहमदनगर : हवाला रॅकेटमधील ९७ लाख रुपयांची रोकड शहर वाहतूक शाखा आणि कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रात्री जप्त केली.

हवाला रॅकेटमधील ९७ लाखांची रोकड जप्त
अहमदनगर : हवाला रॅकेटमधील ९७ लाख रुपयांची रोकड शहर वाहतूक शाखा आणि कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रात्री जप्त केली. या प्रकरणी खिस्त गल्ली येथे राहणारा आशिष पटेल (मूळ रा. गुजरात) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, हवालातील रक्कम पकडली गेल्याने हवाला रॅकेट चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आशिष हा त्याच्या मित्राबरोबर गुटख्याच्या एका पिशवीत ९७ लाख रुपयांची रोकड घेवून जात होता. शुक्रवारी रात्री मार्केट यार्ड परिसरात वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक पावसे यांनी त्याला हटकल्यानंतर त्याचा साथीदार पळून गेला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पावसे यांनी तत्काळ उपअधीक्षक बजरंग बनसोडे आणि कोतवालीचे निरीक्षक सोमनाथ मालकर यांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच आशिष याला ताब्यात घेतले. दोघे जण ९७ लाखांची रोकड नगरमधून अन्य ठिकाणी घेवून जात होते. मात्र ही रक्कम कोठे घेवून जात होते, हे चौकशीतच निष्पन्न होईल. या गुन्ह्याला मोठी व्याप्ती असण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, नवे अतिरिक्त अधीक्षक राजा रामासामी, उपअधीक्षक बजरंग बनसोडे, निरीक्षक सोमनाथ मालकर, अजित लकडे, शशिराज पाटोळे, कोतवालीचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)