८६ जवान सैन्यात दाखल; शिर्डीचा पवार सुवर्णपदकाचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 13:23 IST2017-05-20T13:23:41+5:302017-05-20T13:23:41+5:30
मॅकॅनाईज्ड इनफन्ट्री रेजिमेंट सेंटर (एमआयआरसी) या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण

८६ जवान सैन्यात दाखल; शिर्डीचा पवार सुवर्णपदकाचा मानकरी
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ २० - मॅकॅनाईज्ड इनफन्ट्री रेजिमेंट सेंटर (एमआयआरसी) या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन ८६ जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला़
शनिवारी पहाटे एमआयआरसीच्या मैदानावर जवानांना शपथ देण्यात आली़ कमांडिंग आॅफिसर ब्रिगेडियर व्ही़ एस़ राणा यांनी परेड निरीक्षण केले़ कर्नल आऱ पी़ रामसिंग यांना पहिली तर कर्नल डी़ के़ बिस्ट यांना सैनिकांनी दुसरी सलामी दिली़ ब्रिगेडियर राणा यांनी उघड्या जीपमधून परेडचे निरीक्षण केले़ छात्रांनी आपापाल्या धर्मगुरुंकडून देशसेवेची शपथ घेतली़ राणा यांनी सैनिकांना संबोधित करताना छात्रांनी प्रशिक्षणादरम्यान केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले़ तसेच देशाबाहेर व देशांतर्गत संरक्षणाची जबाबदारी प्राणपणाने पार पाडण्याचे आवाहन केले़
शिर्डी येथील रमेश पवार यांनी सुंदरजी गोल्ड मेडल पटकावले़ भूम (जि़उस्मानाबाद) येथील अविनाश पाटोळे यांनी रजत मेडल, देवीसिंह यांनी कास्य पदक पटकावले़ ब्रिगेडीयर व्ही़ एस़ राणा यांच्या हस्ते छात्रांना पदक देऊन गौरविण्यात आले़