‘मैदानी’त ८० टक्के तरुण पात्र
By Admin | Updated: June 8, 2014 00:35 IST2014-06-07T23:39:34+5:302014-06-08T00:35:11+5:30
अहमदनगर : पोलीस भरती प्रक्रियेमध्ये दुसऱ्या दिवशी उमेद्वारांनी चांगला प्रतिसाद दिला. गेल्या दोन दिवसात हजर असलेल्या उमेदवारांपैकी ८० टक्के उमेदवार मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरले आहेत.

‘मैदानी’त ८० टक्के तरुण पात्र
अहमदनगर : पोलीस भरती प्रक्रियेमध्ये दुसऱ्या दिवशी उमेद्वारांनी चांगला प्रतिसाद दिला. गेल्या दोन दिवसात हजर असलेल्या उमेदवारांपैकी ८० टक्के उमेदवार मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरले आहेत. शनिवारी मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्यांना रविवारी सकाळी त्यांची धावण्याची स्पर्धा होणार आहे. भरती प्रक्रियेला रविवारी सुटी देण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यातील १७९ जागांसाठी शुक्रवारी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी तब्बल नऊ हजार अर्ज आले आहेत. दरदिवशी दीड हजार विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येत आहे. सकाळी सहापासूनच पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस मुख्यालयात ठाण मांडून आहेत. पहिल्या दिवशी निम्म्या उमेदवारांनी चाचणीला दांडी मारली होती. शनिवारी दीड हजार उमेद्वारांपैकी १ हजार ७० उमेदवारांनी हजेरी लावली. सर्व चाचण्या झाल्यानंतर ८६४ उमेदवार पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)
पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई
पोलीस भरती प्रक्रिया हा विषय गंभीर असल्याने प्रक्रिया सुरू असलेल्या परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांना मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याकडे मोबाईल आढळून आल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. उशिरा येणारे आणि धावण्याच्या स्पर्धेसाठी सांगून जातो म्हणून दोन-तीन तास गायब असणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी सांगितले.
एकाची तक्रार
मैदानी चाचणीमध्ये एका उमेदवाराचे गुण दुसऱ्या उमेदवाराला गेल्याचा प्रकार आढळून आला आहे. तशी तक्रार उमेदवाराने केल्यानंतर व्हीडिओ कॅमेरा आणि सीसीटीव्ही चित्रणामध्ये तपासणी करण्यात आली. उमेदवाराची तक्रार योग्य असल्याने तशी लगेच दुरुस्ती करण्यात आली. सर्व यंत्रणा पारदर्शक असल्याने कोणावरही अन्याय होणार नाही, असे शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
उमेदवारांची भरती प्रक्रिया
प्रक्रिया शुक्रवार शनिवार
उमेदवार संख्या१५०० १५००
हजर ७४१ १०७०
गैरहजर ७५९ ४३०
कागदपत्रांअभावी अपात्र७१ ७२
छाती-उंचीमुळे अपात्र९४ १३४
मैदानी चाचणीस पात्र५७५ ८६४