रेमडेसिविरविना ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:13+5:302021-05-01T04:19:13+5:30

पाचेगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबांवर वडीलधारी, तरणीबांड मुलं गमावण्याची वेळ आली. अनेक कोरोनाबाधित व्यक्ती धास्तीने बळी ...

75-year-old senior overcomes corona without remediation | रेमडेसिविरविना ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची कोरोनावर मात

रेमडेसिविरविना ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची कोरोनावर मात

पाचेगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबांवर वडीलधारी, तरणीबांड मुलं गमावण्याची वेळ आली. अनेक कोरोनाबाधित व्यक्ती धास्तीने बळी पडत असताना वय ७५, स्कोर १६ आणि ऑक्सिजनची लेव्हल ९३ च्या खाली येऊनही प्रबळ इच्छाशक्ती आणि खंबीर मनाच्या जोरावर पंढरीनाथ दगडू आव्हाड यांनी या आजारावर मात केली.

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील पंढरीनाथ दगडू आव्हाड असे कोरोनावर मात केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. १२ एप्रिलच्या मध्यरात्री ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या मुलांनी तत्काळ त्यांना स्थानिक खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याने त्यांना एचआरसीटी स्कॅन करण्याचा सल्ला देण्यात आला. दुसऱ्या दिवशी सिटी स्कॅन केल्यानंतर स्कोर १६ असल्याचा रिपोर्ट आला.

त्यानंतर खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू झाला असेल तर त्यांची मुले असलेल्या हरिभाऊ आणि संदीप यांचा. वडिलांना दाखल कुठे करायचे, ऑक्सिजन बेड मिळेल का? अशा विवंचनेत ते दोघे होते.

श्रीरामपूर, नेवासा, नगर, औरंगाबाद शहरातील अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण, कुठेही बेड मिळेना. नाईलाजास्तव दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलांनी भेंडा येथील कोविड केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. येथील कोविड केंद्रात दोन दिवस उपचार करूनही वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईना.

शेवटी रुग्णाला नेवासा फाटा येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाला मानसिक आधार देण्याचे महत्त्वाचे काम केले. सोबत कुटुंबाची प्रेरणा मिळत होती. यामुळे रुग्णाच्या तब्येतीत दिवसेंदिवस सुधारणा होत गेली. आठवडाभर बेडवर असलेल्या या रुग्णाला ना महागड्या औषधांची, इंजेक्शनची गरज भासली. ना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची. वेळीच आजाराची घेतलेली दक्षता आणि साधी औषधे घेऊन अवघ्या दहा दिवसांत ते ठणठणीत बरे झाले. ते गेल्या बारा दिवसांपासून होम क्वारंटाईन आहेत. बाधित रुग्णांनी या आजारात खचून न जाता हा आजार बरा होणारा आहे. मन खंबीर करून या आजारावर मात करता येऊ शकते असाच मौल्यवान संदेश यातून दिला आहे.

--

मी या आजाराला खंबीरपणे तोंड द्यायचे ठरविले होते. मला दुसरा कोणताच शारीरिक आजार नसल्याने जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती होती. वेळीच आजारावर घेतलेली दक्षता, मुलांनी घेतलेला योग्य निर्णय तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कुटुंबातील प्रत्येकांनी दिलेला मानसिक आधार त्यामुळे आजारातून पूर्णपणे बरा झालो आहे.

-पंढरीनाथ आव्हाड,

कोरोनामुक्त झालेले ज्येष्ठ नागरिक

---

३० पंढरीनाथ आव्हाड

Web Title: 75-year-old senior overcomes corona without remediation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.