७३ व्यापाऱ्यांच्या फाईल्समध्ये गडबड
By Admin | Updated: October 29, 2014 23:58 IST2014-10-29T23:49:28+5:302014-10-29T23:58:22+5:30
अहमदनगर: स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरणाऱ्या ७३ व्यापाऱ्यांच्या फाईल्समध्ये गडबड आढळून आली.

७३ व्यापाऱ्यांच्या फाईल्समध्ये गडबड
अहमदनगर: स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरणाऱ्या ७३ व्यापाऱ्यांच्या फाईल्समध्ये गडबड आढळून आली. या व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्यानंतर उपायुक्त अजय चारठाणकर यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. विवरणपत्रातील तफावत व गत आर्थिक वर्षात कर भरणा न झाल्याचे या सुनावणीत समोर आल्याचे सांगण्यात आले.
अजय चारठाणकर हे औरंगाबादला असताना तेथील एलबीटी वसुलीत मोठी वाढ झाली होती. आता ते नगरला उपायुक्त म्हणून आल्यानंतर त्यांनी एलबीटी उत्पन्नवाढीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. जकात त्यानंतर पारगमन शुल्क वसुली बंद झाल्याने महापालिका आर्थिक संकटात आहे. उत्पन्न वाढीसाठी एलबीटीशिवाय पर्याय नाही. गत महिन्यात चारठाणकर यांनी एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या फाईल्स तपासल्या होत्या. त्याचवेळी त्यात गडबड असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांची सुनावणी ठेवण्यात आली. बुधवारी ७३ पैकी ६५ व्यापाऱ्यांच्या फाईल्सची तपासणी करण्यात आली.
२०१२-१३ वर्षात काहींनी एलबीटी भरला नसल्याचे निदर्शनास आले. या आर्थिक वर्षात कर न भरण्याची कारणे चारठाणकर यांनी जाणून घेतली. काही व्यापाऱ्यांनी २०१३-१४ वर्षात कर भरला. त्यामुळे गत आर्थिक वर्षात एलबीटीचे उत्पन्न कमी दिसले.
आयकर विवरण पत्र व एलबीटी भरताना महापालिकेला सादर केलेले विवरणपत्र यात तफावत असल्याचे सुनावणीत दिसून आले.
व्यापाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली. आता उपायुक्त चारठाणकर हे कायदेशीर निर्णय घेणार आहेत. यामुळे उत्पन्न वाढीस हातभार लागणार आहे.(प्रतिनिधी)