६४ जवान सैन्यात दाखल
By Admin | Updated: August 4, 2014 00:43 IST2014-08-03T23:38:08+5:302014-08-04T00:43:41+5:30
अहमदनगर : एमआयआरसी येथे झालेल्या शानदार दीक्षांत संचलनात ६४ जवान देशसेवेची शपथ घेत सैन्यदलात दाखल झाले. हे जवान आता देशाच्या विविध भागात पुढील प्रशिक्षणासाठी रवाना होतील.
६४ जवान सैन्यात दाखल
अहमदनगर : एमआयआरसी येथे झालेल्या शानदार दीक्षांत संचलनात ६४ जवान देशसेवेची शपथ घेत सैन्यदलात दाखल झाले. हे जवान आता देशाच्या विविध भागात पुढील प्रशिक्षणासाठी रवाना होतील.
येथील मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) मधील आखोरा ड्रील कवायत मैदानावर सकाळच्या प्रसन्न वातावरणात या जवानांनी शानदार संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. एमआयआरसीच्या आयटी बटालियनचे मुख्य अधिकारी कर्नल एम.एस. सचदेव यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी उघड्या जीपमधून जवानांच्या संचलनाचे निरीक्षण केले. त्यानंतर परेड अॅडज्युटंट मेजर अनिल कुमार यांनी संचलनाच्या सूचना दिल्या. राष्ट्रगीताची धून सुरू असताना मैदानातून राष्ट्रध्वज व एमआयआरसीच्या निशानाचे संचलन करण्यात आले. उपस्थितांसह सर्व अधिकारी, जवानांनी उभे राहून ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर आपापल्या धर्मगुरूंकडून जवानांनी धर्मग्रंथावर हात ठेवून देशसेवेची शपथ घेतली.
दरम्यान, सचदेव यांनी जवानांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देत, जवानांनी परकीय, तसेच देशांतर्गत आक्रमणापासून देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी सदैव तयार राहण्याचे आवाहन केले. देशसेवा करण्याची संधी मिळणे हे तुमचे भाग्य असून, जीवाची बाजी लावून तुम्ही त्याचे पालन करा, असा सल्लाही त्यांनी भावी जवानांना दिला. (प्रतिनिधी)
३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जवान जसिमुद्दीन एस. के. याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, मोहितकुमार याला रौप्य आणि भुपेंद्रसिंह याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले.