५३ गावात ग्रामसभा तहकूब
By Admin | Updated: August 17, 2015 00:02 IST2015-08-16T23:57:40+5:302015-08-17T00:02:04+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील १ हजार १९७ ठिकाणी ग्रामसभा झाल्या असून ५३ गावात वेगवेगळ्या कारणामुळे ग्रामसभा तहकूब झाल्या आहेत.

५३ गावात ग्रामसभा तहकूब
अहमदनगर : स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा सक्तीच्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार १ हजार १९७ ठिकाणी ग्रामसभा झाल्या असून ५३ गावात वेगवेगळ्या कारणामुळे ग्रामसभा तहकूब झाल्या आहेत. पुरेशा गणसंख्ये अभावी या सभा तहकू ब झाल्या असून ६२ ठिकाणी पुढील आठ दिवसात ग्रामसभा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने देण्यात आली.
शनिवारी स्वातंत्र्यदिनी जिल्हाभर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अभियान, वॉटर बजेट, जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजनेचा वर्षभराचा आराखडा, गावात झालेली अतिक्रमणे आणि ग्रामस्थांच्या असणाऱ्या तक्रारी यासह अन्य विषयाचे सक्तीने वाचन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विशेष करून प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी आपल्या समस्या आणि तक्रारी मांडण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले होते.
त्यानुसार जिल्ह्यात १ हजार १९७ गावात सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरणात ग्रामसभा झालेल्या आहेत. ६२ ठिकाणी निरीक्षक उपलब्ध न झाल्याने त्या ठिकाणी पुढील आठ दिवसात ग्रामसभा होणार आहेत. तर ५३ ठिकाणी ग्रामसभा तहकूब करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये नव्याने ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र त्यांच्याकडे अद्याप पदभार आलेला नाही. यामुळे त्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली आणि जे पराभूत झालेले आहेत तेही या सभेकडे आले नाहीत. अशा गावात ग्रामसभा झालेल्या नाहीत.
(प्रतिनिधी)