वांबोरी चारीसाठी ५३ कोटी
By Admin | Updated: October 27, 2023 15:17 IST2014-05-14T23:25:23+5:302023-10-27T15:17:19+5:30
करंजी : पाथर्डी-नगर तालुक्यातील सुमारे चौदा गावांसाठी वरदान ठरणार्या वांबोरी चारी टप्पा दोनसाठी सुमारे ५३ कोटींचा निधी मंजूर झाला

वांबोरी चारीसाठी ५३ कोटी
करंजी : पाथर्डी-नगर तालुक्यातील सुमारे चौदा गावांसाठी वरदान ठरणार्या वांबोरी चारी टप्पा दोनसाठी सुमारे ५३ कोटींचा निधी मंजूर झाला असून यासंदर्भात मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली असल्याची माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिली आहे. पाथर्डी-नगर तालुक्यातील सुमारे चौदा गावांचा या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला असून, यासाठी ५३ कोटींचा निधी मिळणार असून, ३२ पाझर तलावांचा यामध्ये समावेश असून, पाणी मुळा धरणातून उचलले जाणार आहे. मुळा धरण ते उदरमलपर्यंत लोखंडी पाईपलाईन वापरली जाणार आहे. यासाठी नुकतीच मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पालकमंत्री मधुकर पिचड, माजी खा.प्रसाद तनपुरे, पाटबंधारे विभागाच्या मुख्य सचिव नलिनी शंकर, एकनाथ पाटील, मुख्य अभियंता सावळे, पंचायत समितीचे उपसभापती संभाजी पालवे, राजेंद्र दगडखैर यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. वांबोरी चारी टप्पा दोनचे काम त्वरित मार्गी लागावे यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला शासन मंजुरी देणार आहे. वांबोरी चारी टप्पा दोनचा प्रस्ताव यापूर्वीच दाखल केला होता. मात्र त्यामध्ये काही त्रुटी आढळल्याने तो परत पाठवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पाटबंधारे विभागाने त्रुटी दूर करून तो प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे मुंबई येथे पाठवला. त्यानंतर तो प्रस्ताव शासनाने स्वीकारला आहे. आता वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली असून, टप्पा दोनचे काम त्वरित सुरू करण्यासाठी माजी खा.प्रसाद तनपुरे, प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे, जि.प. उपाध्यक्षा मोनिका राजळे, पं.स. उपसभापती संभाजीराव पालवे, माजी जि.प. सदस्य मोहनराव पालवे, अरूण आठरे, काशिनाथ लवांडे, संभाजी वाघ यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वांबोरी चारी प्रश्न मार्गी लागला तर पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. (वार्ताहर)